खारघर मध्ये अभिनय प्रशिक्षण शिबीराला सुरूवात
पनवेल : पनवेल महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, नेत्रा पाटील, युवा अध्यक्ष नितेश पाटील, संध्या सरबिंदे, महापालिका मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, ‘अ. भा. मराठी नाट्य परिषद'चे प्रमुख कार्यवाहक शामनाथ पुंडे, स्मिता गांधी, समीर कदम, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, अमोल खेर तसेच प्रशिक्षक प्रा. रवि धुतडमल, संकेत खेडकर आणि रंगकर्मी उपस्थित होते.
यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले, रोजच्या आयुष्यात आपणा सर्वांना अभिनय करावा लागतो. परंतु, उत्तम अभिनय करण्यासाठी आवाजातील चढ उतार, शैली, कौशल्याची गरज असते. त्यासाठी या अशा अभिनय शिबिराची गरज आहे. खारघरकरांसाठी या परिसरात नाट्यगृहाची आवश्यकता असून लवकरच ती पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश ठाकूर, यांनीही शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनय प्रशिक्षणासारखा उपक्रम खारघर मध्ये घेतल्याबद्दल त्यांनी महापालिका आणि ‘नाट्य परिषद'चे आभार व्यक्त केले.
पनवेल मधील नाट्यकलावंतांना अभिनयासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचा विकास होण्यासाठी प्रशिक्षण मिळावे याकरिता महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पुढाकार घेऊन ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद'चे पनवेल शाखा उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्यातून सर्वांसाठी विनामूल्य अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचा समारोप ‘अ. भा. नाट्यपरिषद'चे कार्यवाहक शाम पुंडे यांनी केला.
महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रतिसादामुळे सकाळी ९ ते १२ दुपारी १ ते ४ आणि सायंकाळी ५ ते ८ अशा तीन सत्रात शिबिर होणार आहे. दोन गटात अभिनय शिबीर घेण्यात येणार असून यामध्ये पहिला गट वय वर्षे ८ ते १६, दुसरा गट १६ ते ६० वयापर्यंत आहे. ८ दिवस अभिनय शिबीर हेाणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शामनाथ पुंडे यांनी केले.