सणासुदीच्या काळात सोन्याच्या दागिन्यांवर लुटारूंची नजर

नवी मुंबई : गौरी-गणपतीपासून नवरात्र, दिवाळीपर्यंतचा काळ हा उत्सवांचा असतो. या काळात महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटारूंसाठी मोठे आकर्षण ठरतात. गर्दी, मिरवणुका, मंदिरदर्शन अशा ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना तर घडतातच, शिवाय महिलांना विशेषतः वृद्ध महिलांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करणाऱ्यांचीही संख्या वाढते. नकळत विश्वास बसवून सोन्याचे दागिने उतरवून घेणे किंवा खोट्या आमिषाने फसवून मौल्यवान वस्तू लुबाडणे अशा घटना सणासुदीत वारंवार घडतात.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ४२ चेन स्नॅचिंगच्या घटनांची नोंद झाली आहे. यात सुमारे ४४ लाखांचे दागिने लुटून नेले आहेत. या गुन्ह्यातील २६ गुन्हे उघडकीस आणण्यात तसेच काही प्रमाणात दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर मागील सात महिन्यांमध्ये बतावणी करून विशेषतः वृद्ध महिलांजवळचे दागिने लुबाडल्या प्रकरणी १८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये देखील लाखो रुपये किमतीचे दागिने लुबाडली गेली आहे. यातील फक्त ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर गुन्ह्यात वाढ होत असल्याने पोलिसांचीही धावपळ वाढली आहे.

महिलांनी घ्यावयाची काळजी

गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान मौल्यवान दागिने परिधान करणे टाळावे.

अनोळखी व्यक्ती बोलण्यात गुंतवते आहे, गोड बोलून कुठलेही आमिष दाखवत आहे असे जाणवल्यास त्वरित सावध व्हावे.

सार्वजनिक ठिकाणी एखादा आपल्याला दागिने उतरवायला सांगत असेल (उदा. “तुमचे दागिने सुरक्षित नाहीत, काढून ठेवा”) तर अशा सूचनांकडे दुर्लक्ष करावे.

वृद्ध महिलांनी एकट्याने बाजारपेठेत किंवा मंदिरात जाणे टाळावे, शक्यतो सोबतीने जावे.

संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना त्वरित कळवावे.

पोलिसांकडून उपाययोजना

गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, मिरवणुका व मंदिर परिसरात पोलिसांचे पथक सतत तैनात करणे.

सार्वजनिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता तपासून सातत्याने निरीक्षण ठेवणे.

फसवणूक व बतावणी प्रकारांबाबत महिला, वृद्ध नागरिक यांना विशेष जनजागृती करणे.

दुचाकीस्वार स्नॅचर्सना आळा घालण्यासाठी बाईक पथक, तर फसवणूक प्रकरणात तत्काळ कारवाईसाठी झटपट प्रतिसाद पथक नियुक्त करणे.

नागरी वेशातील गुप्तहेर तैनात करून संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे.

सणांचा आनंद सुरक्षिततेसह अनुभवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिसांकडून मजबूत गस्त व तत्पर कारवाई अपेक्षित असली तरी नागरिकांनीही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. ‘सावधानता हीच सुरक्षा’ या सूत्रावर भर दिल्यास चेन स्नॅचिंग, फसवणूक व बतावणीसारख्या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणावर आळा घालता येईल.

पंकज डहाणे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ–१),

सणासुदीच्या काळात महिलांच्या अंगावरील दागिन्यांकडे गुन्हेगारांचे डोळे लागतात. चेन स्नॅचिंग, बतावणी किंवा फसवणुकीसारखे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्त, सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणि जनजागृती मोहिमा सुरू आहेत. मात्र, नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनोळखी व्यक्तींच्या बोलण्याला बळी पडू नये आणि गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने घालणे शक्यतो टाळावे. पोलिस हेल्पलाईन क्रमांक  ११२ वर त्वरित संपर्क साधल्यास आम्ही तत्काळ मदत करू.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दीड कोटींची विदेशी दारु जप्त