रबाळे पोलिसांची यशस्वी कारवाई- १२ तासात १९ लाखांचे दागिने हस्तगत
नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी एका महिलेचे 19 लाख 13 हजार रुपये किंमतीच्या दागिने चोरी प्रकरणाचा अवघ्या 12 तसात यशस्वी तपास करुन चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. तसेच सदरचे दागिने महिलेला सुपुर्द केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. रबाळे पोलिसांनी अवघ्या 12 तासात दागिने हस्तगत करुन महिलेला परत केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
पनवेल मधील करंजाडे येथे राहणाऱया शकुंतला शंकर गायकर (58) यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून त्या गत 31 जुलै रोजी घणसोली बाजारात आल्या होत्या. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या जवळचे तब्बल 19 लाख 13 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ओफ्पो कंपनीचा मोबाईल फोन चोरुन नेले होते. त्यामुळे शकुंतला गायकर यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे, पोलीस हवालदार वाईंगणकर, कारण काळ, राजेश तडवी आणि राहुल साळुंखे यांच्या पथकाने तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला.
पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात घणसोली ते तळवली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करुन संशयित आरोपीचा माग काढून ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडुन चोरीचे संपुर्ण दागिने हस्तगत केले. त्यानंतर शुक्रवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या हस्ते शकुंतला गायकर यांना त्यांचे सर्व दागिने सुपूर्द करण्यात आले. चोरीला गेलेले आपले सर्व दागिने परत मिळाल्याने शकुंतला गायकर यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कामगिरीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.