नवी मुंबईत सुध्दा ‘मीच तो नामदेव ढसाळ'चा एल्गार
नवी मुंबई : ‘हल्ला बोल' या चित्रपटातील पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर आक्षेप घेत ‘कोण नामदेव ढसाळ?' असा अवमानकारक प्रश्न सेन्सॉर बोर्डाच्या एका अमराठी सदस्याने उपस्थित केल्याबद्दल नवी मुंबईतही याविरोधात आवाज उठवण्यासाठी मधुकर वारभुवन, चंदूदादा जगताप, राम झेंडे, अभिमान जगताप, अश्वजित जगताप व इतरांनी एकत्र येवून सीवूड येथील लुंबिनी बुद्ध विहारात मान्यवरांचा काव्य वाचनाचा कार्यक्रम अलिकडेच आयोजित केला होता.
जेष्ठ लेखिका व कवयित्री डॉ.प्रज्ञा पवार, प्रसिद्ध सिने अभिनेत्री चिन्मयी सुमित, प्रसिद्ध लेखिका व कवयित्री नीरजा, ज्येष्ठ लेखक, कवी व शाहीर संभाजी भगत, प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता व गायक कैलास वाघमारे आणि या कार्यक्रमाचे मुख्यसूत्रधार व समन्वयक जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते उपस्थित होते. संविधान उद्देशिकेच्या वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास नमुंमपा शिक्षणाधिकारी सौ. अरूणा यादव, गझलकार अप्पा ठाकूर, कवी व पत्रकार दुर्गेश सोनार, पँथर सुमेध जाधव, पत्रकार निलेश झाल्टे, कवी जितेंद्र लाड, ढसाळ परिवारातील डॉ.स्वप्नील ढसाळ आणि नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील मान्यंवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर वारभुवन यांनी केले तर प्रास्ताविक चंदूदादा जगताप यांनी केले. पँथर राम झेंडे यांनी आभार मानले.