उद्घाटनानंतर अवघ्या १० दिवसात न्यायालय भवनात त्रुटी
अंबरनाथ : अंबरनाथ मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायालय भवनाचे उद्घाटन होऊन जेमतेम १० दिवस झाले होत नाही तोच नुतन वास्तुतील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. छतावरुन प्लास्टर कोसळणे, लिपटमध्ये नागरिक अडकणे आणि पावसाचे पाणी साचणे यामुळे न्यायालयीन कामकाजासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यायालयाच्या या नवीन इमारतीच्या छतावरुन प्लास्टर गळून खाली पडत आहे, तर काही ठिकाणी लोखंडी रॉड उघडे दिसत आहेत. या प्रकारामुळे सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच एका वकिलाला लिपटमध्ये जवळपास अर्धा तास अडकून रहावे लागले होेते. लिपटमध्ये आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचेही समोर आले आहे.
यासोबतच इमारतीच्या आवारात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून, पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सोय नाही. या सर्व प्रकारांमुळे न्यायालयात येणारे नागरिक, वकील आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर बाबींवर ॲड. जय गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अशा दर्जाहिन आणि धोकादायक काम करणाऱ्या ठेकेदाराला सरकारने तात्काळ ब्लॅकलिस्ट करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. न्यायालय भवन म्हणजे न्यायदानाचे प्रतिक आहे, अशा ठिकाणी निकृष्ट दर्जाचे बांधकाम होणे दुर्दैवी आणि अस्वीकार्य आहे.
दरम्यान, सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘स्वराज्य संघटना'तर्फे शासनाकडे करण्यात येणार आहे.