क्षयरोगविरोधी लढ्यात उल्हासनगर महापालिका आघाडीवर
उल्हासनगर : एका जीवघेण्या रोगावर मात करण्याचा निर्धार, समाजाला आरोग्यमान बनवण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी एक सामूहिक पाऊल... अशाच सकारात्मक ऊर्जा आणि सेवाभावातून उल्हासनगर महापालिकेच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर क्षयरोग विरोधातील लढ्याचे गांभीर्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून क्षयरोग दिन उल्हासनगरमध्ये प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध शाळा तसेच महाविद्यालयांत रांगोळी आणि निबंध स्पर्धांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनात्मकतेतून ‘टीबीमुक्त भारत' या विषयावर विचार व्यक्त करत समाजातील आरोग्य प्रश्नांबाबत जागरुकतेचा दीप प्रज्वलित केला. टीबीग्रस्त रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करून ‘निक्षय मित्र' या समाजसेवी घटकांनी आपली माणुसकीची जबाबदारी निभावली. उल्हासनगर महापालिकेच्या वतीने या सेवाभावी व्यक्तींना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यामुळे सामाजिक सहभागाची एक नवी दिशा शहराला मिळाली.
२०२५ पर्यंत ‘टीबीमुक्त भारत'चा संकल्प...
‘जागतिक आरोग्य संघटना'ने २०३० पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे ध्येय जरी जाहीर केले असले, तरी भारताने २०२५ पर्यंत टीबीमुक्त देश बनवण्याचा निर्धार केला आहे. त्या दिशेने उल्हासनगर महापालिका तर्फे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको, वेळेवर तपासणी हीच जीवनरक्षक गुरुकिल्ली...
टीबी श्वासावाटे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. सतत खोकला, वजन घटणे, रात्री घाम येणे यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. सरकारच्या मोफत उपचार योजनांमुळे वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
२४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कॉक्स यांनी मायको ट्युबरक्लुलोसिस या जीवाणूचा शोध लावून क्षयरोगाच्या उपचाराच्या दृष्टीने महत्वाचा ठरवला. त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. त्याच प्रेरणेने आजही क्षयरोगाविरुध्द लढाई सुरु आहे, एकत्रित प्रयत्न, सकारात्मक दृष्टीकोन आणि आरोग्याविषयी जागरुकता हेच ‘टिबी'च्या उच्चाटनासाठी आवश्यक घटक आहेत. महापालिका तर्फे राबविण्यात आलेले कार्यक्रम केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित न राहता, वास्तवात परिवर्तन घडवणारे ठरले असून महापालिकेने टीबी विरोधात एक सशक्त आरोग्य अभियान सुरु ठेवले आहे. जागतिक क्षयरोग दिन निमित्त उल्हासनगरकरांनी या लढ्याचा एक भाग बनावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-मनीषा आव्हाळे, आयुक्त-उल्हासनगर महापालिका.