एपीएमसी मार्केट बाहेरील दुकानदारांकडून सामासिक जागेचा गैरवापर

तुर्भे : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) माथाडी भवन परिसरात  दुकानदारांकडून सामासिक जागेचा (मार्जिनल स्पेस) व्यावसायासाठी मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाच्या  अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे येथे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणाऱ्या मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये पाच मार्केट आहेत. यामुळे एपीएमसी परिसरात दररोज शेकडो लोकांची ये-जा असते. एपीएमसी मार्केट परिसरामध्ये माथाडी भवन तसेच अन्य ठिकाणी एपीएमसी मार्केटला पूरक उत्पादनांची किरकोळ आणि होलसेल दुकाने आहेत. या दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या जागे इतकेच दुकानापुढील सामासिक जागेमध्ये पावसाळी शेड टाकले आहे.

विशेष म्हणजे सामासिक जागा कमी पडते म्हणून की काय अगदी फुटपाथवरही एपीएमसी मार्केट मधील दुकानदारांनी साहित्य ठेऊन पादचाऱ्यांचीही वाट अडवली आहे. तसेच सणासुदीच्या काळात एपीएमसी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होऊन फुटपाथवर चालण्यास जागा कमी पडत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन रस्त्यावरुन चालावे लागत आहे.  

वास्तविक पाहता सामासिक जागेत पावसाळी शेड उभारायला अनुमती नाही. मात्र, पावसाळी शेडखाली दुकानातील साहित्य ठेऊन त्याची विक्री केली जाते. १०० पेक्षा अधिक दुकानदारांकडून सामासिक जागेतील शेड खाली साहित्य ठेऊन त्याची विक्री करुन लाखो रुपयांची कमाई केली जाते. तसेच काही दुकाने किराणा माल, स्टेशनरी साहित्य विक्रीची असून, त्यापुढील सामासिक जागा फरसाण विक्रेत्यांना भाड्याने देऊन दुकानदार वरकमाई करत आहेत. याची नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाला माहिती असूनही, सामासिक जागेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे टाळले जात आहे. तुर्भे विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना प्रत्येक दुकानामागे ठराविक रक्कम दिली जात असल्याने महापालिका तुर्भे विभाग अधिकाऱ्यांकडून सामासिक जागेचा गैरवापर करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे. सदर रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवली जात असल्यामुळे मुख्यालयातील अतिक्रमण विभाग देखील याकडे डोळेझाक करत असल्याचे बोलले जाते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इटीसी केंद्रामध्ये दिव्यांग मुलांसमवेत आयुक्तांनी केली दिवाळी साजरी