‘आरती संग्रह'द्वारे स्वच्छता-पर्यावरणशीलतेचा संदेश

नवी मुंबई : उद्या २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सवास प्रारंभ होत असून गणेशोत्सव काळात घरोघरी आणि सार्वजनिक उत्सवांच्या मंडपात सकाळ, संध्याकाळ श्रीगणेशासह इतर देव-देवतांच्या सामुहिक आरत्या म्हटल्या जातात. या आरत्या म्हणणे नागरिकांना सोयीचे व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दुमड घडी स्वरुपातील आरतीसंग्रह उपलब्ध करुन देण्यात येत असून या अभिनव ‘आरती संग्रह'चे अनावरण महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुकत सुनिल पवार आणि डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, अति.शहर अभियंता अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, स्मिता काळे तसेच इतर विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

या ‘आरती संग्रह'मध्ये एका बाजुला गणपती, शंकर, देवी, वि्ील, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या आरत्या आणि घालीन लोटांगण अशी प्रार्थना मुद्रीत करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या बाजुला स्वच्छता, कचरा वर्गीकरण, प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, सजावटीत पुनर्वापरयोग्य पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा उपयोग, निर्माल्यापासून खत निर्मितीवर भर असे विविध संदेश आकर्षक चित्रांसह प्रकाशित करण्यात आले आहेत.

या माध्यमातून नवी मुंबई महापालिका नवी मुंबईकर नागरिकांपर्यत स्वच्छता, पर्यावरणपूरकता आणि प्लास्टिक मुक्तीचा संदेश व्यापक स्वरुपात घेऊन जात आहे. सदर आरती संग्रह महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी वितरीत केले जात असून शालेय विद्यार्थ्यांमार्फतही घराघरात पोहोचविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे विविध समाज माध्यमांवरुनही ‘आरती संग्रह'चे व्यापक प्रसारण होणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उल्हास नदीवरील पुलाला झाडा-झुडपांचा विळखा