‘लोक अदालत'मध्ये यशस्वी तोडगा

सीबीडी : बेलापूर येथील कौटुंबिक न्यायालयात ‘राष्ट्रीय लोक अदालत'चे आयोजन करण्यात आले. या विशेष ‘लोक अदालत'मध्ये एकूण १८ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी ८ जोडप्यांनी आपल्या कौटुंबिक मतभेदांना बाजुला ठेवून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या ‘लोक अदालत'मध्ये बेलापूर कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश डॉ. रचना तेहरा, ‘डी. वाय. पाटील विद्यापीठ'च्या विधी विभाग संचालिका करुणा मालविया, ‘नवी मुंबई वकील संघटना'च्या अधिवक्ता हेमांगी पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांचे मार्गदर्शन आणि समुपदेशनामुळे अनेक प्रकरणे परस्पर संमतीने सोडविण्यात यश आले.

बेलापूर येथील सत्र न्यायालयाप्रमाणेच कौटुंबिक न्यायालयात देखील ‘लोक अदालत'चे आयोजन करण्यात आले होते. या लोकदालतीमध्ये एकूण १८ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. या ‘लोक अदालत'मध्ये पती-पत्नींमधील वादामुळे विभक्त राहणाऱ्या जोडप्यांना समुपदेशनाच्या मदतीने नव्या सुरुवातीचा मार्ग दाखवण्यात आला. समुपदेशनानंतर या जोडप्यांनी परस्पर समजुतीने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ८ जोडपे आपल्या कौटुंबिक मतभेदांना बाजुला ठेवून पुन्हा एकत्र आले. पुन्हा पुनर्मिलन झालेल्या या जोडप्यांना नव्या जीवनाच्या सुरुवातीचे प्रतिक म्हणून रोपांचे वाटप करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.  

५ वर्षांपासून प्रलंबित पालकत्व हक्काचा वाद निकाली...  
कौटुंबिक न्यायालयातील एका प्रकरणात आई-वडिलांमध्ये दीर्घकाळ सुरु असलेल्या मतभेदांमुळे मुलाच्या संगोपनाचा प्रश्न कठीण झाला होता. ‘लोक अदालत'च्या समुपदेशनामुळे दोन्ही पालकांनी संयुक्त पालकत्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे ५ वर्षांपासून प्रलंबित असलेला पालकत्व हक्काचा वाद देखील सामंजस्याने निकाली काढण्यात आला. त्यामुळे बालकाच्या भविष्यासाठी योग्य तोडगा निघाला.  

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ४ प्रकरणांवर निकाल...  
काही पक्षकार वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना डिजीटल माध्यमातून आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. या ‘लोक अदालत'मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ४ प्रकरणे निकाली काढण्यात आली.  

‘लोक अदालत'द्वारे न्याय मिळालेल्या कुटुंबांनी समाधान व्यक्त केले. दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेला पर्याय म्हणून लोक अदालत अत्यंत फायदेशीर आहे, असे मत अनेक पक्षकारांनी व्यक्त केले. बेलापूर कौटुंबिक न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी ‘लोक अदालत'च्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबध्द आणि प्रभावी पद्धतीने पार पडला.  

लोक अदालत- कुटुंबांसाठी सकारात्मक पाऊल...
‘लोक अदालत'च्या माध्यमातून कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे कुटुंबांना वेळ आणि पैशांची बचत होत असून न्याय लवकर मिळत आहे. यापुढेही अशा ‘लोक अदालत'चे आयोजन करुन कुटुंबांना तडजोडीच्या मार्गाने समाधान मिळवण्यास मदत केली जाणार आहे.

‘लोक अदालत'मध्ये बेलापूर कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी महत्वाची भुमिका बजावली. ‘लोक अदालत'मध्ये उपस्थित पक्षकारांना सामंजस्याने वाद सोडविण्याच्या महत्वावर भर दिला. ‘लोक अदालत'मुळे न्यायसंस्थेवरील ताण कमी होते. तसेच लोकांना जलद आणि सहज न्याय मिळतो. वादविवाद सामंजस्याने सोडवणे हेच सर्वोत्तम समाधान आहे.  
-डॉ. रचना तेहरा, प्रमुख न्यायाधीश, बेलापूर कौटुंबिक न्यायालय. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एमआयडीसी पाणी देईना; टँकरचा भाव परवडेना!