‘खारघर शहर दारुमुक्त'साठी २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने

खारघर : राज्य शासनाने खारघर शहर ‘दारुमुक्त शहर', अशी घोषणा करावी, या मागणीची तड लावण्यासाठी येत्या २८ एप्रिल रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘खारघर संघर्ष समिती'चे पदाधिकारी संजय जाधव, केशरीनाथ पाटील, किर्ती मेहरा, त्रिवेणी सालकर आदींनी १७ एप्रिल रोजी पत्रकार परिषद मध्ये दिली.

खारघर शहर निसर्गरम्य, स्वच्छ, सुंदर आणि सर्व मूलभूत सोयींनी सुसज्ज शहर आहे. खारघर वसाहतीत अनेक शाळा-महाविद्यालय असून, या शाळा-कॉलेज मध्ये हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे खारघर शहर ‘शैक्षणिक हब' म्हणून ओळखले जाते. तरुणाईच्या भवितव्यासाठी आणि खारघर मधील रहिवाशांच्या भावना लक्षात घेऊन खारघर भागात मद्य विक्री करण्यासाठी परवाने दिले जाऊ नयेत, यासाठी ‘खारघर संघर्ष समिती' तर्फे २००७ पासून मोर्चे काढण्यासह, आंदोलन करण्यासह शासन दरबारी पत्रव्यवहार केला जात आहे. याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधीनी विधानसभा, महापालिका सभागृहात ‘खारघर दारुमुक्त' करावे यासाठी शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने जनआंदोलन उभारले जाणार असून, २८ एप्रिल २०२५ रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करुन जिल्हाधिकारी प्रशासनाला मागणीचे निवेदन दिले जाणार आहे, असे ‘खारघर संघर्ष समिती'चे पदाधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.

रायगड जिल्हाधिकारी प्रशासनाने मागणीची दखल घेतली नाही तर १८ मे २०२५ रोजी खारघर मध्ये १ दिवसीय लक्षणिक उपोषण आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात खारघर मधील जेजे रसोई आणि निरसुख हॉटेल यांना मद्यविक्री परवाना देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेला चुकीचा अहवाल, खारघर सेक्टर-७ मधील साई शरण हॉटेल तर्फे ५ मीटर रस्ता आणि उद्यानाच्या जागेवर केलेले अतिक्रमण तसेच जेजे रसोई हॉटेल द्वारे अतिक्रमण करुन उभारलेली शेड, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सिडको आणि पनवेल महापालिका अधिकाऱ्यांचा निषेध केला जाणार आहे. याशिवाय ३१ मे आणि १ जून रोजी खारघर मध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे, असे ‘खारघर संघर्ष समिती'चे पदाधिकारी केशरीनाथ पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये जाहीर केले.

या पत्रकार परिषद मध्ये खारघर परिसरातील महिलांनी ‘महिला शवतीचा एकच नारा, खारघर दारु मुक्त करा', ‘संघर्ष उद्या संघर्ष आज, दारु विकणाऱ्यांचा उतरवू माज', ‘संघर्ष आमचा दारु मुवतीचा' आणि ‘लांब ठेवा लांब ठेवा, ‘खारघर'ला दारुपासून लांब ठेवा', या घोषणांचे फलक हातात घेवून सहभाग घेतला होता.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धन राखीव म्हणून घोषित