कोपरखैरणे मध्ये दुषित पाणीपुरवठा
कोपरखैरणे : कोपरखैरणे सेक्टर-१८ मधील तीन असोसिएशन इमारत मध्ये गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांना जुलाब, उलट्या आदी पोटाविषयी आजारांना सामोरे जावे लागत आहे.
कोपरखैरणे सेक्टर-१८ येथील जलवाहिन्या ड्रेनेज लाईन लगत असल्याने लिकेजमुळे जलवाहिन्यांमध्ये दिवसभर घाण पाणी साचून राहते. पाणीपुरवठयावेळी सदर घाण पाणी नळाद्वारे घरोघरी जाते. त्यामुळे सुरुवातीच्या पाण्यास दुर्गंधी येत आहे. याबाबत स्थानिक कोपरखैरणे भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख वसंत जाधव यांनी नवी मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिल्यानंतर महापालिकेमार्फत दूषित पाण्याचा स्रोत शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच कोपरखैरणे सेक्टर-१७ मधूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्याच्या तक्रारी येत आहेत. शुद्ध, सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तत्काळ कार्यवाही व्हावी,अशी मागणी वसंत जाधव यांच्यासह कोपरखैरणे येथील नागरिकांनी केली आहे.