पाणीपट्टी, मलनिःस्सारण करवाढी विरोधात ‘काँग्रेस'ची निदर्शन
भिवंडी: भिवंडी महापालिका प्रशासनाने जल लाभ आणि मलनिःस्सारण लाभ कर यामध्ये वाढ केली आहे. निवासी मालमत्तांना १५ टक्के तर वाणिज्य मालमत्तांना २३ टक्के या दराने सदर करवाढ केल्यामुळे भिवंडीतील नागरिकांमध्ये या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात नागरिकांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी ‘काँग्रेस'चे भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने करीत संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्यालय प्रवेशद्वारावरील गेटला टाळे ठोकत तेथेच बैठक मारुन महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनात माजी खासदार सुरेश टावरे, तारिक फारुखी, सोहेल खान, रुकसाना कुरेशी, आर्शि आजमी यांच्यासह अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. महापालिका प्रशासनाने चालू वर्षीच्या घरपट्टी सोबत नवीन जल लाभ आणि मल लाभ कर वाढ करुन घरपट्टी वसुलीची बिले दिली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे.
२०११ मध्ये महापालिका प्रशासनाने अशी दरवाढ केली होती. त्याला नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर तो स्थगित केला होता. ११ फेब्रुवारी रोजी महापालिका प्रशासनाचे प्रमुख प्रशासक असलेल्या तत्कालीन आयुक्तांनी सदरव दरवाढ पुन्हा लागू केली आहे. प्रशासकांना अशी कोणतीही दरवाढ करण्याचा अधिकार नाही. येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुका झाल्यावर त्यावर लोकप्रतिनिधी यावर निर्णय घेतील. तोपर्यंत महापालिका प्रशासनाने त्वरित सदर दरवाढीस स्थगिती द्यावी, अशी मागणी ‘काँग्रेस'चे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केली आहे.