पनवेल-उरण मधील पाणीटंचाईवर आ. प्रशांत ठाकूर आक्रमक
पनवेल : पाणी पुरवठा आणि वितरण संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत ‘सिडको'च्या कारभावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर येत्या २ महिन्यात पाणी वितरणासाठी ऑटोमायझेशनसाठी (स्वयंचलित यंत्रणा) निविदा जाहीर करण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले असून या निर्देशानुसार कार्यवाही न केल्यास ‘सिडको'च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. ‘सिडको'च्या माध्यमातून नवी मुंबई मधील पनवेल आणि उरण तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात आ. प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यावेळी आमदार ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडताना नागिरकांच्या भावना आक्रमकपणे प्रकट केल्या. तसेच सिडको अधिकाऱ्यांच्या कारभारावर संताप व्यक्त करत ताशेरे ओढले.
लक्षवेधी सूचनेवर लेखी उत्तरात मोघम उत्तर देण्यात आले होते. त्यामुळे त्याचा उल्लेख करत आमदार ठाकूर यांनी म्हटले की, न्हावाशेवा टप्पा-३, बाळगंगा, हेटवणे, मोरबे या सगळ्या धरणांचा इतिहास लेखी उत्तरात दिला आहे. बाळगंगा पासून सर्व प्रकल्प आता अर्धवट स्थितीत आहेत किंवा कामे चालू स्थितीत आहेत. यामधून होणारा पाणी पुरवठ्याचा तुडवडा होत राहतो. पाण्याची पाईपलाईन सातत्याने गळत राहतात आणि २-२, ३-३ दिवस पाणी बंद केले जाते. खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल, उलवा नोड, करंजाडे, द्रोणागिरी या सर्व वसाहतींमध्ये तुडवडा असल्याने ‘सिडको'च्या विरोधात प्रचंड संताप नागरिकांमध्ये आहे. येथील नागरिक मध्यमवर्गीय असून कदाचित त्यांच्या कुटुंबातील दोन्हीही व्यक्ती उद्योगधंदा करतात किंवा नोकरीला जातात. आणि अशा वेळेला पाणीच नसेल तर आंघोळ करु शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे या लोकांची चिडचिड आणि त्यांना संताप होत असतो. त्या आपल्या व्यथा आमच्याकडे सतत मांडत असतात, असे आ. प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
दिवाळीच्या दिवशीही घरात पाणी नाही असे सांगतात. कितीही मागणी बैठका घेतल्या तरी अधिकाऱ्यांवर याचा काहीही फरक पडत नाही. वरिष्ठ अधिकारी या बाबतीत तर पूर्णपणे उदासीन असून ते केवळ वेळ मारून नेतात. आम्ही धरण बांधतोय असे सांगतात; मात्र उपाय निघत नाही. लोकांना आज पाणी हवे आहे आणि अधिकारी उद्या येणार आहे, असे सांगतात तर आजच्या दिवशी काय करायचे? असा प्रश्न नागरिकांमध्ये आहे.
टाटा कन्सल्टन्ट एजन्सीचा अहवाल ‘सिडको'कडे येऊन दिड वर्ष झाले आहे. पुढील कार्यवाही का करत नाही? त्यासाठी ‘सिडको'कडे पैशाची कमतरता आहे का? असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला.
सिडको विमानतळ बांधत आहे, करोडोंची प्रकल्प उभारत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुढे होणाऱ्या वसाहतींचा पाण्याअभावी काय चित्र राहणार आहे, याचीही कल्पना करायला हवी. पाणी वितरणामध्ये पाईपलाईनची दुरुस्ती करणारे, पम्प हाऊस चालविणारे, टँकर पुरवणारे ठेकेदार तसेच अभियंता सर्व मिळून पैसे खातात. पाणी वितरणाच्या बाबतीत ऑटोमायझेशन झाले पाहिजे यासाठी आम्ही मागणी करुन करून थकलो; मात्र ‘सिडको'च्या अधिकाऱ्यांना याच्याशी घेणे देणे नाही. या बाबतीत शासनाने गंभीर झाले पाहिजे.
-आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल.