महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीला विरोध - प्रा. अशोक बागवे

 

पनवेल : लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, असे संतश्रेष्ठ  तुकाराम महाराज म्हणतात. मात्र, सद्यःपरिस्थिती पाहता  आम्हाला लहानपण पुन्हा देवू नका. आता आम्हाला पहिलीपासून हिंदी सक्तीने शिकावी लागेल. भाषा कुठलीही वाईट नाही. कुठल्याही भाषेबद्दल आम्हाला अनादर नाही. मात्र, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालू देणार नाही, असा इशारा देतानाच राज्य सरकारच्या ‘त्या' सचिवांच्या निषेधाचा ठराव संमेलनाध्यक्ष कवीवर्य प्रा. अशोक बागवे यांनी संमेलनात मांडला.

विश्वव्यापी मराठी साहित्य सांस्कृतिक परिषद आणि कांतीलाल प्रतिष्ठान रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथे आयोजित ३ रे एक दिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन १९ एप्रिल रोजी संपन्न झाले. त्यावेळी प्रा. बागवे बोलत होते.

तत्पूर्वी सकाळी पनवेल एसटी स्टॅण्डसमोरील हॉटेल विसावा येथून ‘ग्रंथदिंडी'ला प्रारंभ झाला. पनवेल तालुक्यातील वारकऱ्यांच्या साथीने साहित्य ‘ग्रंथदिंडी'चे पुजन संमेलनाध्यक्ष अशोक बागवे, स्वागताध्यक्ष कांतीलाल कडू यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. टाळ, मृदूंग, तुतारीच्या निनादात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या जयघोषात वाजत गाजत दिंडी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात स्व. हरिश्चंद्र चांगू कडू साहित्य नगरीत आली.

नाट्यगृहात दिंडीचे आगमन झाल्यानंतर संत तुकाराम महाराज ग्रंथ दालनाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 

‘साहित्य संमलेन'चे उद्‌घाटन उद्‌घाटक तथा ‘राज्य साहित्य मंडळ'चे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंग ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, संमेलनाध्यक्ष अशोक बागवे, स्वागताध्यक्ष कांतीलाल कडू, ‘महाराष्ट्र वारकरी महामंडळ'चे राज्य सचिव हभप नरहरी महाराज चौधरी, ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे, ‘विश्वव्यापी मराठी साहित्य सांस्कृतिक परिषद'चे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सेक्रेटरी बंडू अंधेरे, सहसेक्रेटरी डॉ. राजेंद्र राठोड, कायदेविषयक सल्लागार ॲड. विलास नाईक, खजिनदार सुरज म्हात्रे, कार्यकारिणी सदस्य नंदू सावंत उपस्थित होते.

मराठी इंडियन आयडॉल सागर म्हात्रे यांनी महाराष्ट्र गीत गाऊन संमेलनाला प्रारंभ केला. स्वागताध्यक्ष कांतीलाल कडू यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मराठीतील यशस्वी चित्रकार, लेखक, एकांकिकाकार, नाट्यलेखक, नाट्यदिग्दर्शक, संगीतकार, अभिनेते, प्रकाश योजनाकार, वेशभूषाकार आणि सिनेदिग्दर्शक अशी ख्याती असलेले ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांना विश्वव्यापी मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचा पहिला ‘जीवन गौरव' पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच कवी, गजलकार, नाटककार, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या लेखणीतून प्रसविलेले सूर्याची लगोरी आणि अव्यक्ताचे औक्षण या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात  आले.

इंग्रजी ज्ञानाची खिडकी असायला काही हरकत नाही. पण, मराठी भाषा ज्ञानाचा दरवाजा असायला हवा. दरवाजाने यजमान माणूस आत येतो, तर खिडकीवाटे येतो, त्याला चोर म्हणतात, अशी कोपरखळीही प्रा. बागवे यांनी केली. मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी संमेलन आयोजित करणे आवश्यक आहे, असेही प्रा. बागवे म्हणाले.

दरम्यान, अभिजात म्हणजे काय? ज्यांनी दिले त्यांना तरी माहित आहे का? ४०० कोटी रुपये केंद्राने दिलेत, ते मिळालेत का? ते कुठे खर्ची केले? असा प्रश्न प्रा. बागवे यांनी उपस्थित करुन अभिजात भाषेची व्याख्या सांगितली.

माझी माय अभिजात आहे, ते शेजाऱ्यांना कशाला विचारायला जावू? माझे ज्ञानोबा, तुकोबा, केशवसूत, कुसुमाग्रज सर्व अभिजातच आहेत. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून उपकार केले नाहीत, अशी कानउघाडणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मधील नेत्यांची प्रा. बागवे यांनी यावेळी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीबीडी मध्ये पक्षांसाठी कृत्रिम पाणवठे