डी.वाय.पाटील स्टेडियम परिसरात तीन दिवस वाहतूकीत बदल  

नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील स्टेडीयममध्ये सोमवारपासून फाईव्ह एसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाने दि. 20, 23 आणि 26 ऑक्टोबर रोजी नेरुळ येथील भिमाशंकर सोसायटी ते एल.पी. रिक्षा स्टँड या दरम्यानचा सर्व्हिस रोड सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंदी केली आहे. तसेच या सर्व्हीस रोडवर वाहने पार्किंग करण्यास देखील पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.  

नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील स्टेडीयममध्ये दि. 20, 23 आणि 26 ऑक्टोबर रोजी फाईव्ह एसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील तीन सामने खेळवले जाणार आहेत. हे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी मोठÎा प्रमाणात प्रेक्षक येणार असल्याने स्टेडीयम परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. स्टेडीयम लगत असलेला भिमाशंकर सोसायटी ते एल.पी. रिक्षा स्टँड या दरम्यानचा सर्व्हिस रोड खेळाडू आणि मान्यवरांच्या आगमन-विगमनासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.  

त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाने क्रिकेट सामने असलेल्या दिवशी भिमाशंकर सोसायटी ते एल.पी. रिक्षा स्टँड या दरम्यानचा सर्व्हिस रोड सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. याबाबतची अधिसुचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी जारी केली आहे. या बंदी मधून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलिस वाहने, शासकीय व अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहने, जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने, एसीसी व्यवस्थापनाचे अधिकृत पासधारक वाहनांना वगळण्यात आले आहे.  

वाहतूक बदलात करण्यात आलेल्या बदलाची नागरीकांनी नोंद घ्यावी, तसेच अनावश्यक गर्दी टाळावी आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी सायन-पनवेल महामार्गावरील उरण फाटा ते एल.पी. ब्रिज या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली