खारघर सेक्टर-१२ मध्ये  दूषित पाणी पुरवठा

खारघर : खारघर सेक्टर-१२ मध्ये जलवाहिनीत सांडपाणी मिश्रित होत असल्याचा संशय रहिवाशांना असून, पाण्याला वेगळाच वास येत आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून, ‘सिडको'ने दूषित पाणी समस्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

खारघर सेक्टर-१२ परिसरातील बी टाईप मधील धनलक्ष्मी, सावली, गीतांजली, माऊली, सुनयना तसेच रस्त्यालगत असलेल्या रो हाऊस मध्ये अडीच-तीन महिन्यांपूर्वी दूषित पाणी पुरवठा झाल्याची तक्रार प्राप्त होताच जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. दरम्यान, पुन्हा गेल्या तीन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे उलटी, जुलाब आजारी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  खारघर सेक्टर-१२ परिसरातील रहिवाशांनी दूषित पाणी संदर्भात ‘सिडको'च्या पाणी पुरवठा विभागात तक्रार केल्यावर ‘सिडको'ने पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत, असे  खारघर सेक्टर-१२ परिसरातील रहिवाशांनी सांगितले.

दरम्यान, खारघर सेक्टर-१२ परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे तसेच पाण्याला वेगळ्याच प्रकारचा वास येत असल्यामुळे काही नागरिक पाणी विकत घेत असून, काही नागरिक पाणी उकळून पित आहेत.

खारघर सेक्टर-१२ मधील बी टाईप समोरील रस्त्यावरील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावर सांडपाणी वाहत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या समस्याकडे पनवेल महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

‘सिडको'कडून पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याला वेगळ्याच प्रकारचा वास येत असून उलटी, जुलाब आजारात वाढ झाली आहे. सिडको प्रशासनाने दूषित पाणी पुरवठ्याबाबत वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. - सुनील पार्टे, रहिवासी - धनलक्ष्मी सोसायटी, खारघर.

खारघर सेक्टर-१२ परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार प्राप्त झाली नाही. तात्काळ जेसीबी लावून जलवाहिनीचा शोध घेवून दूषित पाणी पुरवठ्याबाबत उपाययोजना केली जाणार आहे. - राहुल सरोदे, उप अभियंता - पाणी पुरवठा विभाग, सिडको.
खारघर सेक्टर-१२ मधील धनलक्ष्मी, सावली, गीतांजली, माऊली, सुनयना तसेच इतर हौसिंग सोसायटी समोरील रो हाऊसेसमध्ये  दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा झाल्यामुळे रहिवाशांना उलटी, जुलाब आणि पोटदुखी आदी आजार बळावल्याची माहिती प्राप्त होताच सिडको आणि पनवेल महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दूषित पाणी पुरवठ्यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.  - दीपक शिंदे, रहिवाशी तथा सरचिटणीस - भाजपा, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची सामुहिक बदलीची मागणी