‘देहरादून'चे महापौर, महापालिका आयुक्तांची मिरा-भाईंदरला भेट

भाईंदर : देशपातळीवर ‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये अव्वल ठरलेल्या आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित झालेल्या मिरा-भाईंदर महापालिकेला ‘देहरादून'चे महापौर, महापालिका आयुक्त, स्वच्छता निरीक्षक यांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन महापालिकेच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला.

भारत सरकारच्या ‘गृहनिर्माण-शहरी कार्य मंत्रालय'तर्फे आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'मध्ये मिरा-भाईंदर महापालिकेची ३ ते १० लाख लोकसंख्या श्रेणीतील ४५८९ शहरामधून सर्वोत्तम शहर म्हणून निवड झाल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापालिकेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्यासाठी देहरादून महापालिकेच्या शिष्टमंडळाने मिरा-भाईंदरला सदिच्छा भेट दिली. शिष्टमंडळामध्ये महापौर सौरभ थपलियाल, आयुक्त नमामि बन्सल, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश बहुगुणा आणि पुष्पा रोथॉन यांचा समावेश होता. महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी शिष्टमंडळ आणि मिरा-भाईंदर महापालिका अधिकारी यांच्यात शहरातील विविध स्वच्छता प्रकल्प, आधुनिक कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञानासह शहरात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी सखोल चर्चा झाली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कचरा संकलन, व्यवस्थापन आणि पुर्नप्रक्रिया या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. शहरातील आर.आर.आर सेंटर, नारळाच्या कचऱ्यापासून तयार होणारे कोकोपीट, देशातील पहिला स्वदेशी नियंत्रित विंड्रो कंपोष्टिंग प्रकल्प, प्लाझ्मा प्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्प यांची सखोल माहिती देण्यात आली. तसेच शाळा, हॉटेल्स, महाविद्यालये आणि सोसायट्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्टार रँकिंग स्पर्धा, स्वच्छता की पाठशाळा अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांविषयी देखील शिष्टमंडळाला माहिती देण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाने स्वदेशी नियंत्रित विंड्रो कंपोष्टिंग प्रकल्पाला भेट देऊन तेथील कामकाजाचा, स्वच्छतेचा तसेच जमा होणारा ओला कचरा ते कंपोष्ट खत बनण्याचा प्रक्रियेचा आढावा घेतला.

स्वच्छतेच्या दिशेने भविष्यातही अशाच नवनवीन उपक्रमांद्वारे शहर स्वच्छ ठेवत इतर शहरांसाठी आदर्श ठरेल आणि राष्ट्रीय स्तरावर घेतलेली नोंद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
-राधाबिनोद शर्मा, आयुक्त- मिरा भाईंदर महापालिका. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सोशल मीडियावर राहूल गांधींची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी