अंबरनाथमध्ये नागरिकांचा आक्रोश
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेकडील शिवमंदिर परिसरातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले असून, २५ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते निशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स ब्रिजवर भर पावसात जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले.
गुडघाभर पाणी साचणे, रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे ढिगारे आणि सतत खंडित होणारा वीजपुरवठा यांसारख्या गंभीर समस्यांवरुन नागरिकांनी अंबरनाथ नगरपालिकेविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात रिलायन्स ब्रिजवर पाणी साचत असल्याने नागरिक, विशेषतः विद्यार्थी यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याव्यतिरिक्त, परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि कचऱ्याची वाढती समस्या यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. या गंभीर बाबींकडे नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी निशांत पाटील यांनी यापूर्वी अनेकदा पत्रव्यवहार करुन विनंती केली होती. मात्र, नगरपालिकेकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने २५ जुलै रोजी रिक्षा चालक आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी राजेश तडवी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांच्या कामाचा सत्कार केला, जो एक प्रकारे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर उपहासात्मक टीका होती. तडवी यांनी पुढील १५ दिवसांत सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.
दरम्यान, जर १५ दिवसांत समस्या दूर झाल्या नाहीत, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निशांत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे नगरपालिका यावर काय उपाययोजना करते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.