यावर्षी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण नवी मुंबईतील नामवंत व्यक्तींच्या हस्ते करा-मनसे
नवी मुंबई : यावर्षी साजरा होणाऱ्या स्वातंत्यादिनाचे ध्वजारोहण नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या हस्ते करण्याची मागणी मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरवर्षी नवी मुंबईतील विविध शासकीय आस्थापनेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. परंतु खेदाची बाब म्हणजे नवी मुंबईत क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती वास्तव्यास असतानाही फक्त राजकीय दबावामुळे नवी मुंबईतील विविध शासकीय इमारती तसेच महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना नवी मुंबईतील एकाच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.
सध्या नवी मुंबई महापालिकेत सभागृह नसताना तसेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी नगरसेवक नसतानाही माजी नगरसेवकांच्या हस्ते ध्वजारोहण करणे नियमबाह्य असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटनेचा निषेध व्यक्त करत असल्याचे नवी मुंबई मनसेचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी सांगितले.
यावर्षी स्वातंत्र्यदिन साजरा करतेवेळी सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासारख्या नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या नामवंत व्व्यक्तींचे योग्य ते मार्गदर्शन होऊन त्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी मदतच होईल.यासंदर्भातील मागणीचे निवेदन पत्र सविनय म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त शिंदे यांना सादर केले.
यावेळी विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी, महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा भूमिका म्हात्रे, यशोदा जावळ उपस्थित होते.