सानपाडा येथे महाराष्ट्रातील ढोल ताशा पथकांचा वाद्य पुजन सोहळा संपन्न
नवी मुंबई : महाराष्ट्रातील संस्कृती टिकवण्यासाठी राज्याच्या विविध भागातील ढोल ताशा पथके गणेशोत्सव, नवरात्र उत्सव यासह इतर सण आणि समारंभात वर्षभर वाद्ये वाजवित असतात. या वाद्यांची सुरुवात करण्याकरिता सानपाडा, सेक्टर-५ येथील श्री दत्त विद्या मंदिराच्या पटांगणात २५ मे रोजी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, पनवेल, उरण, आदि भागातून आलेल्या ढोल, ताशा, लेझीम पथकांचा भव्य दिव्य वाद्यपुजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, सानपाडा येथील माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, माजी नगरसेविका सौ. कोमल वास्कर, अजित सावंत, अविनाश जाधव, भाजपा कोपरखैरणे मंडल अध्यक्ष राजू मढवी, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, ‘सानपाडा'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कटाळे, ‘स्वराज्य पक्ष नवी मुंबई विद्यार्थी सेना'चे अध्यक्ष विनायक जाधव, ‘पोर्ट ट्रस्ट कामगार अंक'चे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, ढोल ताशा वाद्यपुजन आयोजक शुभम जाधव, आदि उपस्थित होते.
या वाद्यपुजन सोहळ्यात पुणे येथील सुप्रसिध्द ढोल ताशा वादक शिवराज जाधव, सुप्रसिध्द ताशा वादक प्रथमेश जाधव, ‘शिवमुद्रा संस्था'चे ध्वजधारी सुनील मलगे, ‘संस्कृती वाद्यपथक'च्या अध्यक्ष मनीष टाळे, ‘मोरया वाद्य पथक'चे अमित पवार, ‘जगदंबा ढोल ताशा पथक'चे पंचम दादा आदि सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या ढोल ताशा पथकांचे प्रतिनिधी, मान्यवर पाहुणे यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वाद्यपुजनानंतर ढोल ताशा पथकांनी भगवा झेंडा उंचाऊन ढोल प्रात्यक्षिके सादर केली.