इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्या; अन्यथा कारवाई
नवी मुंबई : उच्च न्यायालयाने जनहित याचिका मध्ये पारीत केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या; परंतु भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न करता वापर सुरू केलेल्या इमारतींची यादी नवी मुंबई महापालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर तसेच महापालिकेच्या सर्व ८ विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उच्च न्यायालय मुंबई यांनी विषयांकित याचिकेत २५ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या; परंतु भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरु असलेल्या इमारतींची यादी सादर करण्याबाबत आदेशित केलेले आहे. त्यास अनुसरुन सर्व विभाग कार्यालयांनी सर्वेक्षण करुन बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या; पण भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरु असलेल्या इमारतींचा अहवाल सादर केलेला आहे.
त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अभिलेखातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या; परंतु भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींची माहिती प्रसिध्द करण्यात येत आहे.
या यादीत नमूद इमारती / सोसायटी यांनी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेऊन, भोगवटा प्रमाणपत्र न घेता, वापर सुरु केला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदरची बाब नियमास धरुन नाही. त्यामुळे सदर यादीत नमूद केलेल्या २१११ इमारती, सोसायटी मधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या सर्व इमारतींना वापर सुरु करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
त्यामुळे संबंधितांनी भोगवटा प्रमाणपत्र मिळणेबाबतचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर करुन भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे. अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन-नगररचना अधिनियम, १९६६ च्या तरतुदीनुसार पदनिर्देशीत अधिकारी यांच्यामार्फत नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.