कल्याण दुर्गाडी किल्याची संरक्षण भिंत कोसळली
कल्याण : कल्याण शहराची ओळख आणि ऐतिहासिक ठेवा समजला जाणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याच्या बांधकाम सुरु असलेल्या संरक्षक भिंतीचा भाग ४ जून रोजी पहाटेच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. अवघ्या काही मिनिटांच्या पावसामुळे संरक्षक भिंत कोसळल्याचे कारण संबंधित ठेकेदाराकडून देण्यात येत असले तरी या कामामध्ये कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात बेजबाबदारपणा झाल्याचे सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठेकेदाराला सुनावले.
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला कल्याण शहराची शान आणि प्राचीन वैभव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या दुर्गाडी किल्ल्याच्या दुरुस्ती आणि डागडुजीचे काम केले जात आहे. सदर काम सुरू असतानाच ४ जून रोजी पहाटेच्या सुमारास या किल्ल्याच्या गोविंदवाडी बायपास दिशेला असलेल्या संरक्षण भिंतीचा भला मोठा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच ‘कल्याण पश्चिम'चे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आणि जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या संबंधित ठेकेदाराच्या अधिकाऱ्याला त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.
पाऊस सुरु असतानाही भिंत बांधायचे काम का सुरु ठेवले? एवढ्या मोठ्या प्रमाणात भिंत कोसळली आहे, त्यात जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण? तसेच येत्या २ दिवसात असलेल्या बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाज पडण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी मोठी दुर्घटना झाली असती तर जबाबदारी कोण घेणार? अशा संतप्त प्रश्नांची सरबत्ती आ. विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली. तसेच आमदार भोईर यांनी या भिंतीच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यासंदर्भात पीडब्ल्यूडी आणि पुरातत्त्व खाते एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तर कंत्राटदार याठिकाणी यायलाही तयार नाही. लवकरात लवकर संबंधित ठेकेदार याठिकाणी उपस्थित झाला नाही तर आम्ही ‘शिवसेना स्टाईल'ने त्या कंत्राटदाराला धडा शिकवू, असा दम आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिला.