दिवसा आंदोलन रात्री वाईन शॉप सुरु
खारघर : खारघर सेक्टर-६ मध्ये नव्याने सुरु झालेल्या वाईन शॉप विरोधात संतापलेल्या खारघर मधील नागरिकांनी गोल्डन कॉईन वाईन मार्ट या दारु दुकान समोरील फलकाची तोडफोड केली. दुसरीकडे पनवेल महापालिका तर्फे दारु दुकान समोरील अनधिकृत शेड जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. आंदोलनानंतर दारुची दुकान बंद होईल, असे रहिवाशांना वाटत होते. मात्र, रात्री गोल्डन कॉईन वाईन मार्ट सुरु झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
खारघर सेक्टर-६ मधील शहा आर्केड इमारतीतील दुकान गाळ्यात सोसायटी तसेच पोलीस आणि पनवेल महापालिकेची कोणतेही परवानगी न घेता ‘गोल्डन कॉईन वाईन मार्ट' या नावाने वाईन शॉप सुरु झाल्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, ‘संघर्ष समिती'कडून ‘खारघर शहर दारुमुक्त'साठी शासन दरबारी पत्रव्यवहार सुरु असूनही पनवेल महापालिका,पोलीस आणि सोसायटीची परवानगी न घेताच विना परवाना दारुचे दुकान झाल्यामुळे २० जून रोजी रहिवाशांनी आंदोलन करुन दारु दुकान समोरील फलकांची तोडफोड केली. तर दुकान समोर उभारलेले अनधिकृत शेड महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त केले.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे खारघर शहर दारुमुक्त असावे, यासाठी नागरिक ‘संघर्ष समिती'च्या माध्यमातून दारु दुकानाला प्रखर विरोध करीत असतानाही शासनाकडून दारु दुकानांना परवानगी देऊन युवा पिढीला नशेच्या खाईत लोटण्यात येत आहे, असा आरोप खारघर मधील नागरिक करीत आहेत.
दरम्यान, आंदोलन उपस्थित नागरिकांना संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्थानिक प्रशासनाची परवानगी नसताना सुरु झालेले वाईन शॉप बंद करण्यात यावे, यासाठी पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठविला जाणार आहे. तसेच येणाऱ्या पुढील आठवडयात ‘संघर्ष समिती'च्या पदाधिकाऱ्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क विभाग आयुक्त यांची भेट घेवून वाईन शॉप बंद करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. यावेळी आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील ,काँगेस नेते सुदाम पाटील यांनी, आम्ही खारघर मधील जनतेसोबत असून, दारु दुकान बंद झाली पाहिजे, असे सांगितले.
दारु दुकान विरोधातील आंदोलनात ‘खारघर कॉलनी फोरम'च्या अध्यक्षा लीना गरड, ‘मनसे'चे रायगड जिल्हा चिटणीस केशरीनाथ पाटील, म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील,‘शेकाप'च्या रायगड जिल्हा सहचिटणीस तेजस्वी घरत, शिवसेनेचे गुरुनाथ पाटील, माजी सरपंच संजय घरत, ‘संघर्ष समिती'चे पदाधिकारी कीर्ती मेहरा, डॉ. वैभव बदाणे, त्रिवेणी सालकर, तुकाराम कंठे , ‘खारघरचा राजा ट्रस्ट'चे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि रहिवाशी मोठया संख्येने सहभागी झाले होते.