कोपरी, खैरणे, बोनकोडे, पावणे परिसरात पुन्हा वायू प्रदुषणाचा मारा?

वाशी : पावसाने उघडीप घेताच खैरणे, पावणे एमआयडीसी मधील कारखानदारांकडून रात्री पुन्हा एकदा वायू प्रदुषणाचा मारा सुरु करण्यात आला आहे. मात्र, वायू प्रदुषणामुळे कोपरी, खैरणे, पावणे परिसरात दर्प वासाने रहिवाशांना त्रास होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला  आहे.

नवी मुंबई शहराच्या पूर्वेला औद्योगिक वसाहत  वसली आहे. तर घणसोली, कोपरखैरणे विभाग औद्येागिक पट्ट्याला लागूनच वसलेले आहेत. त्यामुळे औद्योगिक पट्ट्यात होणाऱ्या प्रदूषणाचा फटका या विभागांना अधिक होत असतो. सध्या पावसाने उघडीप घ्ोतल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर कोपरी गाव, बोनकोडे, वाशी सेक्टर-२६ या परिसरात  रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याचे चित्र दिसत आहे. २ सप्टेंबर नंतर पुन्हा एकदा ९ सप्टेंबर रोजी रात्री कोपरी गाव, बोनकोडे, वाशी सेक्टर-२६ या परिसरात वायू प्रदूषण आढळून आले. रासायनिक युक्त वायू हवेत सोडल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे नागरिकांना मळमळ वाटण्यासह श्वास घेण्यास अडचण येत होती. कोपरी गाव, बोनकोडे, वाशी सेक्टर-२६, खैरणे, पावणे या भागात वाढणाऱ्या वायू प्रदूषणा बाबत वारंवार तक्रारी करुन देखील ‘ये रे माझ्या मागल्या' परिस्थिती आहे. मात्र, रात्री वायू  प्रदूषण होत असले तरी १० सप्टेंबर रोजी नवी मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम आणि समाधानकारक दाखविण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मार्फत नवी मुंबई शहरात हवा गुणवत्ता मोजमाप करणारी यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.महापे ८२ एक्यूआय, सानपाडा ९३ एक्यूआय, कोपरी, वाशी  ७४ एक्यूआय दाखवण्यात आला आहे.हवा गुणवत्ता तवता जरी समाधान कारक दाखवत असला तरी वास्तवात रात्री होणाऱ्या वायू प्रदूषणाने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसरीकडे आता पुढील काळात वायू प्रदूषणात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने  वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी, नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

मागील चार-पाच वर्षांपासून कोपरी गाव, बोनकोडे, वाशी सेक्टर-२६, खैरणे, पावणे या परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात वायू प्रदुषणाचा मारा केला जात आहे. परिणामी उन्हाळ्यात येथील हवेची गुणवत्ता एकदम ढासळलेली असते.त्यामुळे नवी मुंबई महापालिका पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रशासनाने वेळीच वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. - मनीषा भोईर, स्थानिक रहिवासी - सेक्टर- २६, वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कृत्रिम तलाव एक नवीन संकट