माजी आमदार बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण
उरण : दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी धावणारे नेते माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला उरण तालुक्यातील ‘दिव्यांग संघटना'ने जाहीर पाठिंबा दर्शवून १३ जून रोजी तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढला.
‘प्रहार जनशवती पक्ष'चे संस्थापक तथा दिव्यांगाचे आधारस्तंभ माजी आमदार बच्चू कडू शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाज घटकांच्या विविध मागण्यांसाठी अमरावती येधील गुरुकुंज मोझारी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ ८ जून पासून अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत. बच्चू कडू यांच्या आंदोलनास उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटना आणि दिव्यांग बांधवांतर्फे जाहिर पाठिंबा दर्शविण्यासाठी उरणमध्ये मुक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी तहसीलदार उध्दव कदम यांना निवेदन देत असताना ‘दिव्यांग सामाजिक संघटना'च्या सदस्यांनी सांगितले की, उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांचा माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा आहे. सरकारने लवकरात लवकर विविध मागण्यासंदर्भात बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करावी, त्याकरिता शासन दरबारी आमची मागणी पोहचविण्यात याावी. तसेच जर यापुढे सदर मागण्या संदर्भात अनुकूल चर्चा नाही झाली तर उरण तालुक्यातील दिव्यांग बांधव उपोषणाला बसतील.
याप्रसंगी ‘दिव्यांग सामाजिक संस्था'चे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच उरण तालुक्यातील इतर सामाजिक संघटनांचे सदस्य देखील उपस्थित होते.