माणकोलीतील अपह्रत मुलगा नवी दिल्लीत सापडला
भिवंडी : माणकोली-डोंबिवली दरम्यानच्या पुलाजवळून अपहृत झालेला शाळकरी मुलगा थेट नवी दिल्लीत गजबजलेल्या बाजारातील दुकानात सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या मुलाचे व्हॉटस्ॲपवरुन लोकेशन सापडल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी थेट माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर कपिल पाटील यांनी तत्काळ नवी दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पोलिसांसह मुलाचा शोध घेण्यास सांगितल्यानंतर, अवघ्या तासाभरात सदर मुलगा एका दुकानात आढळला. व्हिडीओ कॉलवरुन मुलाला पाहिल्यानंतर त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
भिवंडी तालुक्यातील वेहळे येथील रुद्र निलेश भोईर काल्हेर येथे दहावीत शिकत आहे. तो ४ जुलै रोजी माणकोली-डोंबिवली पुलाजवळील कॅफेमध्ये गेला होता. त्याठिकाणी सूट घातलेल्या व्यक्तीबरोबर तो बोलत होता. त्या व्यक्तीबरोबर आणखी दोघे जण होते. त्यानंतर चौघेही बोरिवली येथे गेले. बोरीवली येथे रुद्र याला रेल्वेचे तिकीट काढण्यास सांगितले गेले. त्यानंतर ते रेल्वेच्या जनरल डब्याने नवी दिल्लीला गेले. नवी दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसेपर्यंतचा काहीसा घटनाक्रम रुद्र याला आठवत आहे. मात्र, त्यानंतर त्या बाजारात कसा पोचला, ते त्याला ठाऊक नाही.
दुसरीकडे रुद्र हरविला असल्याचे समजताच त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेऊन ठिकठिकाणी शोध सुरू केली. त्याचे वडील निलेश भोईरपंढरपूर येथे यात्रेला गेले होते. ते तातडीने घरी परतले. मात्र, ३ दिवस त्यांना मुलाचा शोध घेण्यास यश आले नाही. दरम्यानच्या काळात ७ जुलै रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास रुद्रचे व्हॉटस्ॲप वरुन लोकेशन समजले. निलेश भोईर यांच्यासह नातेवाईकांनी तत्काळ माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक राम माळी यांच्याबरोबर संपर्क साधला. तेथून ते कपिल पाटील यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी आले आणि नवी दिल्ली येथील पोलिसांमार्फत तातडीने शोध घेण्याची विनंती केली.
दरम्यान, या प्रकाराची कपिल पाटील यांनी त्यांच्या नवी दिल्ली येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने गर्दीने गजबजलेल्या सदर बाजारात शोध सुरू केला. त्यावेळी एका दुकानात रुद्र आढळला. त्यावेळी व्हिडीओ कॉलवरुन कर्मचाऱ्यांना रुद्रचा आई-वडिलांबरोबर संवाद घडविला. त्यानंतर रुद्र सुखरुपपणे घरी परतला. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तत्काळ हालचाली केल्यामुळे आम्हाला आमचा मुलगा परत मिळाला, याबद्दल रुद्रचे वडील निलेश भोईर यांनी कपिल पाटील यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, रुद्रप्रमाणे भविष्यात मुलांचे अपहरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक मुलगा आणि पालकांनीही सतर्क राहावे. शाळकरी मुलांनी कोणत्याही अनोळखी माणसाबरोबर संवाद साधू नये. संशयास्पद व्यक्तींची माहिती लगेचच पालक अथवा पोलिसांना कळवावी. अशा प्रकरणांबाबत पोलिसांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले आहे.