खारघर सेक्टर-३४, ३५ मध्ये भीषण ‘पाणी टंचाई'  

खारघर : खारघर सेक्टर-३४ आणि सेवटर-३५ परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या जाणवत असून, आवश्यक पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी रोज अडीच ते तीन हजार रुपये खर्च करुन पाणी टँकर मागवावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खारघर सेक्टर-३४ आणि सेक्टर-३५ परिसर उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या ६-७ महिन्यांपासून गियाना, भूमी त्रिवास रोज, साई प्रसाद सिमरन, जय इन्क्लेव्ह, खारघर सेक्टर-३५ मधील ओमकार हाईट्‌स, हाईड पार्क, एक्रम हेरिटेज, सुजाता, जय गणेश, अरिहंत, अनया, साई मिरॅकल यांसह अनेक सोसायटीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सिडकोकडे पत्रव्यवहार करुनही पाणी पुरवठ्याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे.

पाणी टंचाईमुळे खारघर मधील बहुतांश हौसिंग सोसायट्यांमधील नागरिकांना पाण्याच्या टँकरसाठी महिन्याला दीड ते दोन लाख रुपये खर्च करावा लागत आहे.  सिडकोकडून  कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत ‘सिडको'च्या पाणी पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार तसेच अधिकाऱ्यांची भेट घेवूनही दखल घेतली जात नाही, असा आरोप खारघर मधील पाणी टंचाईग्रस्त रहिवाशांकडून केला जात आहे. पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी काही हौसिंग सोसायट्यांनी स्वखर्चाने  बोअरवेल खोदल्या आहेत.  सिडको, बोअरवेल आणि टँकर मधील पाण्यामुळे  आजाराचे प्रकार वाढले असून,  त्वचारोग आणि केस गळती सारखे प्रकार घडत असल्याचेही खारघर मधील रहिवासी सांगत आहेत.

खारघरमध्ये पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ‘सिडको'च्या अखत्यारीत येत असल्याने, खारघर मधील रहिवाशांनी ‘सिडको'कडे पाणी टंचाई बाबत अनेकदा तक्रार नोंदवली आहे. परंतु, सिडकोकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप खारघर मधील रहिवासी करत आहेत. खारघरसारख्या विकसनशील भागात भविष्यात चांगल्या सुविधा मिळतील, या आशेने लाखो रुपये कर्ज काढून खारघर मध्ये घरे विकत घेतली. मात्र, पाणी समस्यांमुळे काय करावे?,  असा प्रश्न खारघर मधील रहिवाशांना पडला आहे.

दरम्यान, खारघर मधील नागरिकांद्वारे पाणी टंचाईबाबत तक्रार प्राप्त होताच रोज सिडकोकडून १०० पेक्षा अधिक टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे, असा दावा ‘सिडको'च्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी केला. याविषयी ‘सिडको'चे कार्यकारी अभियंता व्ही. बी. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

खारघर सेवटर-३५ मधील जयनी हौसिंग सोसायटी मध्ये ६२ पलॅट आणि काही दुकाने मिळून सुमारे दोनशे नागरिक वास्तव्य करीत आहेत. सिडकोकडून रोज ३० ते ४० मिनिटे पाणी उपलब्ध, तेही कमी दाबाने होते. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी खाजगी टँकर द्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे रहिवासी आजारी पडत आहेत. पाण्याच्या टँकरसाठी जयनी हौसिंग सोसायटीला दरमहा एक ते सव्वालाख रुपये खर्च करावा लागत आहे. सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करुनही पाणी टंचाईबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. - राजेश कुमार साह, अध्यक्ष - जयनी हौसिंग सोसायटी, सेक्टर-३५, खारघर.

दोन वर्षांपासून हार्मोनी हौसिंग सोसायटी मध्ये पाणी पुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे रोज अडीच हजार रुपये देवून एक टँकर पाणी मागवावे लागत आहे. तर दर सोमवारी दोन टँकर मागवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. सिडकोकडे दोन वर्षांपासून पाणी टंचाईबाबत पत्रव्यवहार करीत आहे. मात्र, पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी सिडको तर्फे काही उपाययोजना केली जात नाही. - संदेश कर्णे, रहिवासी - हार्मोनी-२ हौसिंग सोसायटी, सेक्टर-३५, खारघर.

खारघर सेक्टर-२ ते सेक्टर-२१ परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘सिडको'ने १० एमएलडी पाणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे मागावे, अशी सूचना केली होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘राडारोडा'च्या भरावाने झाडांची कत्तल?