छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वैभव ‘युनेस्को'च्या जागतिक वारसा यादीत
रायगड : संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणारे १२ किल्ले ‘युनेस्को'च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य' या मान्यतेसह या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडू मधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून रायगड किल्ल्यावर १२ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. राजसदर पासून लेझीम पथक आणि पोलीस पथकाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळीचा माळ येथे जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत पोलिसांनी मानवंदना दिली. तसेच गडावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती.
यावेळी ‘महाड'चे प्रांताधिकारी पोपट ओमासे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.