पाणीटंचाई विरोधात मटका फोडो आंदोलन
उल्हासनगर : गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या तीव्र पाणीटंचाई विरोधात ‘स्वराज्य सामाजिक संघटना'च्या वतीने सुभाष टेकडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उल्हासनगर महापालिका विरोधात पाण्याचे मटके फोडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.
उल्हासनगर शहरातील सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प, समतानगर आणि अन्य परिसरात बहुसंख्य मध्यमवर्गीय, बहुजन समाज राहत आहे. वर्षानुवर्ष या नागरी वस्त्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मुबलक पाणीपुरवठा होत आहे. अशा प्रकारचा दुजा भाव महापालिका प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी यावेळी केला आहे .
आजवर अनेक आंदोलन झाली, अनेक वेळा प्रशासनाने तोंडी आश्वासन दिले; पण परिस्थित आहे तशी असून अद्याप त्यात कोणताही सुधार नाही किंवा एक लेखी आश्वासन नाही. याचा निषेध म्हणून महाड सत्याग्रह या ऐतिहासिक क्रांती दिनी ‘स्वराज्य संघटना'च्या वतीने उल्हासनगर क्र.४ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मडके फोडा आंदोलन करण्यात आल्याचे ‘स्वराज्य संघटना'चे अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन आमचा लढा मुलभूत अधिकारांसाठी आहे आणि तो मिळवल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. उल्हासनगर महापालिकेने मागणी मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात शहरातील नामांकित वकील सचिन खंडागळे, राहुल बनकर, सुधीर पंडीत, कल्पेश माने, माजी नगरसेवक प्रमोद टाले, शांताराम निकम, ज्येष्ठ समाजसेवक के. एस. ससाणे, समाजसेविका शुभांगीताई चव्हाण तसेच इतर मान्यवर सहभागी झाले होते.
सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी हेमंत जाधव, राहुल आढाव, मयूर पगारे, छगन पवार, जावेद शेख, जयराम बागुल, रावसाहेब सदाफुले, विकास बोराडे, विकी म्हस्के, सिद्धार्थ खडताळे, किरण फिस्के, तुषार मिरपगार यांनी अथक परिश्रम घेतले.
‘स्वराज्य संघटना'ची मागणीः
लोकांना स्वच्छ पिण्यासाठी योग्य असेल असे पाणी देण्यात यावे. वेळापत्रकानुसार वेळेत पाणी देण्यात यावे. इतर विभागात जसे पुरक पाणी आहे, तसेच लोकसंख्येनुसार नागरिकांना पुरक आणि समान पाणी देण्यात यावे. लोकसंख्येनुसार एमएलडी पाणी राखीव करावे.