महिला दिनी विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार
नवी मुंबई : महिलांमार्फत विविध कलागुणदर्शनपर कार्यक्रम सादर करीत सुरु झालेला नवी मुंबई महापालिका आयोजित ‘जागतिक महिला दिन'चा विशेष कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृहात जल्लोषात हाऊसफुल्ल गर्दीत पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, इतर अधिकारी तसेच माजी महिला लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण म्हणजेच खऱ्य अर्थाने महिलांना सामर्थ्यवान बनविणे असून त्यादृष्टीने महापालिकेने पुढाकार घ्यावा. महिला बचत गट तसेच महिला मंडळांनी बनविलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने फेरीवाला भूखंडांवर हॉकर्स प्लाझा बनवून त्याठिकाणी महिलांना विशेष प्राधान्य द्यावे, असे मत ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सांगत नमुंमपा क्षेत्रातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मॉलमध्ये जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच एखादी स्वतंत्र इमारत बांधून त्याठिकाणी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजापरेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न व्हावेत, अशी सूचना केली. महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य ते आमदार या प्रवासातील काही अनुभवही त्यांनी यावेळी सांगितले.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी समाजातील महिला आणि पुरुषांच्या व्यस्त प्रमाणाबद्दल गांभीर्य व्यक्त करीत सदर विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येकानेच जागरुक होण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी उपस्थित महिला अधिकारी उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, नयना ससाणे, ललिता बाबर, अभिलाषा म्हात्रे, नगरसचिव चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे, विभाग अधिकारी अलका महापूरकर यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. तसेच करिष्मा शहा यांना महिला उद्योजकता पुरस्कार, शेल्टर असोसिएटस् यांना स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कार्य करणारी संस्था पुरस्कार, मिनल मंडलिक यांना दिव्यांगांकरिता उत्कृष्ट कार्य करणारी महिला पुरस्कार, सुमन बंडगर यांना उत्कृष्ट माध्यमिक शिक्षिका, रंजना साळी यांना उत्कृष्ट प्राथमिक शिक्षिका पुरस्कार, करूणा कोटकर यांना विनावेतन काम करणाऱ्या समाजसेविका तसेच ललिता जितेकर यांना उत्कृष्ट महिला पोलीस कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
त्यासोबतच उत्कृष्ट महिला आशा सेविका म्हणून अनिसा शेख (बेलापूर), प्रतिक्षा पांचाळ (नेरूळ), गीता कदम (वाशी), संध्या आतकरी (तुर्भे), सुषमा फुलमाळी (कोपरखैरणे), शुभांगी देवकर (घणसोली), सविता सुंबे (ऐरोली), सुशिला कोकणे (दिघा) यांना सन्मानित करण्यात आले. तसेच लता पड्याची (बेलापूर), निता ठाकूर (नेरुळ), संगम्मा रूदवडे (वाशी), वंदना गायकवाड (तुर्भे), नमिता विभे (कोपरखैरणे), बारकुबाई मढवी (घणसोली), जयश्री पाटील (ऐरोली), सिताबाई जाधव (दिघा) या महिला स्वच्छतासखींना सन्मानित करण्यात आले.
महिलांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित कलागुणदर्शनपर स्पर्धांना उत्साही प्रतिसाद लाभला होता. यावेळी सर्वच स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांनी उत्साहात आपले सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अखेरीस लकी ड्रॉ काढून प्रत्येक विभागातील भाग्यवान विजेत्या महिलेला पैठणी प्रदान करण्यात आली. अशा प्रकारे ‘जागतिक महिला दिने'चा कार्यक्रम हाऊसफुल्ल गर्दीत जल्लोषात संपन्न झाला.