‘निवडणूक आयोग'चे आदेश धाब्यावर

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द न केल्यामुळे आणि प्रभागनिहाय मतदार यादी वेळेवर उपलब्ध न केल्यामुळे महाविकास आघाडी आणि ‘मनसे'चे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या निषेधार्थ त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी नगरपालिका कार्यालयाबाहेर प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन ठिय्या आंदोलन केले. तसेच मतदार याद्यांची होळी देखील केली.

नगरपालिकेच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करताना त्यात तब्बल ३२ हजार मतदारांचे इतर प्रभागात स्थलांतर झाल्याचा गंभीर घोळ यापूर्वीच समोर आला होता. ‘महाविकास आघाडी'च्या तसेच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सदर चूक नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यादी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, अंतिम मतदार यादी अद्यापही प्रसिध्द न झाल्यामुळे मतदारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती कायम आहे.

प्रशासनाने अंतिम यादीऐवजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर ती त्वरित उपलब्ध करुन दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, ८ नोव्हेंबर रोजी नगरपालिका कार्यालयात ‘मविआ'च्या नेत्यांना प्रभागनिहाय यादी उपलब्ध झाली नाही. प्रभागनिहाय मतदार याद्या सिस्टममध्ये अपलोड न केल्यामुळे विरोधकांचा संताप अनावर झाला. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या ‘मविआ'च्या नेत्यांना नगरपालिका अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली, ज्यामुळे संतापात भर पडली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ‘मविआ'च्या नेत्यांनी नगरपालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध करीत मतदार याद्यांची होळी केली. मतदार यादीमधील संपूर्ण घोळ नेमका कोणामुळे झाला? याची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विरोधकांनी नगरपालिका प्रशासनावर मतदार यादीत हेराफेरी करण्यासाठी जाणूनबुजून विलंब करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या आंदोलनात ‘मनसेे'चे शैलेश शिर्के, विशाल गायकवाड, ‘काँग्रेस'चे माजी नगरसेवक मिलिंद पाटील, उमेश पाटील, ‘शिवसेना (उबाठा)'चे अजित काळे आणि ‘राष्ट्रवादी काँंग्रेस (शरद पवार) गट'चे सलीम खान यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संदर्भात अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही सुधारित मतदार यादी त्यांना दिली आहे. केवळ तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाला आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘शिंदे सेना'चे ‘भाजपा'ला जशास तसे उत्तर