नेत्र चिकित्सकांच्या निष्काळजी उपचारामुळे अनेक रुग्णांना 'सुडोमोनास' संसर्ग; डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
नवी मुंबई : वाशी सेक्टर-10 मधील पंडीत आय सर्जरी ऍन्ड लेझर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांच्या डोळ्यांना गंभीर इजा होऊन त्यांच्या डोळ्यांना सुडोमोनसचा संसर्ग झाल्याचे तसेच काही रुग्णांवर दृष्टी गमावण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या डॉक्टरकडे उपचार घेतल्यानंतर एक डोळा गमावलेल्या 67 वर्षीय ज्येष्ठ नागरीकाने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पंडीत आय हॉस्पीटलमधील डॉ.चंदन पंडीत आणि डॉ.डी.व्ही.पंडीत या दोघांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
कोपरखैरणे येथे राहणारे राजेंद्र गुप्ता (67) हे डिसेंबर 2024 मध्ये वाशीतील पंडीत आय सर्जरी ऍन्ड लेझर हॉस्पिटलमध्ये डॉ. चंदन पंडित यांच्याकडे डोळ्यांच्या उपचारासाठी गेले होते. डॉ.चंदन यांनी आधी उजव्या डोळ्याचे ऑपरेशन केले. त्यानंतर त्यांनी डाव्या डोळ्याचे ऑपरेशन केले. मात्र, दोन्ही शस्त्रक्रियांनंतर गुप्ता यांच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली. शुगर वाढलेली असताना ही डॉक्टरने ऑपरेशन केल्याचे तसेच शुगरचा रिपोर्ट येण्याआधीच दुसरे ऑपरेशनही केल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. याशिवाय, त्यांनी उपचाराच्या कोणत्याही कागदपत्रांवर स्वत:चे नाव न देता डॉ.डी.व्ही.पंडीत यांचे नाव वापरल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे.
गुप्ता यांच्या डोळ्यांना जास्त दुखापत झाल्यानंतर डॉ.पंडीत याने जोगेश्वरी येथील एन. व्हिजन हॉस्पिटलमध्ये पाठवून डॉ.सोमील शेट यांच्या हस्ते पुन्हा ऑपरेशन केले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यातील स्त्राव तपासणीसाठी दिला असता, त्यांना सुडोमोनस संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. डॉ.पंडीत यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या किसन भिकाजी धनावडे (69) त्यांची पत्नी लक्ष्मी धनावडे (64), संजीव महेश गुफ्ता व अजंनी सावंत यांच्या डोळ्यांना देखील गंभीर इजा झाली आहे. डॉ.चंदन पंडीत व डॉ. डी. व्ही. पंडीत यांच्या निष्काळजीपणामुळे या सर्वांच्या डोळ्यांना कायमस्वरूपी इजा झाल्याचे गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
डॉ.चंदन पंडीत यांच्या पदवीची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी व नुतनीकरण क्रमांक नसताना ते पंडीत आय सर्जरी ऍन्ड लेझर हॉस्पिटल हे रुग्णालय चालवत असल्याची गंभीर बाब गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत नमूद केली आहे. त्यानुसार वाशी पोलिसांनी डॉ.चंदन पंडीत आणि डॉ.डी.व्ही.पंडीत यांच्याविरोधात निष्काळजीपणा आणि गंभीर शारीरिक इजा केल्याप्रकरणी तसेच नॅशनल मेडिकल कमिशन ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.