अंत्यविधीसाठी जाणाऱ्या गावकऱ्यांची वाट बिकट
उरण : चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अफकॉन कंपनीने उखडून टाकल्याने अंत्यविधीसाठी जाणाऱ्या गावकऱ्यांना चिखलमय रस्त्यातून वाट काढत भरपावसात मृतदेह घेऊन जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अफकॉन कंपनी विरोधात गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत अफकॉन कंपनीच्या माध्यमातून रेवस करंजा या सागरी उड्डाणपुलाचे काम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. अफकॉन कंपनीने समुद्रकिनाऱ्यावरील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गावकऱ्यांना विश्वासात न घेता उखडून टाकल्याने त्याचा नाहक त्रास सर्वाधिक करंजापाडा, नागपाडा, बोबडीपाडा येथील शेतकरी, कोळी बांधवांना सहन करावा लागत आहे. ३ ऑगस्ट रोजी जगदीश लक्ष्मण म्हात्रे या रहिवाशाचा मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना त्यांचे नातेवाईक, गावकरी मंडळींना उखडलेल्या चिखलमय रस्त्यातून वाट काढत जावे लागले. भरपावसातून जगदीश म्हात्रे यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाताना त्यांच्या नातेवाईक, गावकरी मंडळींना गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे अफकॉन कंपनी विरोधात गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अफकॉन कंपनीचे अधिकारी वर्ग गावकरी, शेतकरी,कोळी बांधवांना विश्वासात घेऊन कोणत्याही प्रकारचे काम करत नाहीत. त्यांनी ‘हम करो सो कायदा' या भूमिकेत राहून परिसरातील गावकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच अफकॉन कंपनीने स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उखडून टाकल्याने अंत्यविधीसाठी जाणाऱ्या गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे. सदर प्रकार अफकॉन कंपनीने थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा जनतेत उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.
-सचिन डाऊर, सामाजिक कार्यकर्ते.