सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे तेथे सातत्याने होणा-या विविध उपक्रमांमुळे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात आहे. या स्मारकातून बाबासाहेबांच्या ग्रंथवाचनाप्रमाणेच युवा अभ्यासकही तयार व्हावेत या भूमिकेतून नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’ या विषयावर पदव्युत्तर पदवी नंतरचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करणेबाबतचा सामंजस्य करार मुंबई विद्यापीठासोबत 25 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिन अर्थात सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आला.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विभागप्रमुख उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, स्मारकाच्या सल्लागार संध्या अंबादे. मुंबई विद्यापीठाचे उपकुलपती प्राचार्य डॉ.अजय भामरे, निबंधक डॉ. प्रकाश कारंडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र मुंबई विद्यापीठाच्या विभागप्रमुख डॉ मनीषा करणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे अभ्यासकांसाठी ग्रंथसंपदा व ई लायब्ररीच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे अभ्यासकेंद्र म्हणून 3 वर्षांच्या कालावधीतच नावाजले जात आहे. तथापि यापुढील काळात या स्मारकाचा उपयोग अभ्यासकांप्रमाणेच जनसामान्यांना व्हावा ही आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची भूमिका असून त्याठिकाणी सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, कामगारांचे सबलीकरण, बालकांचे हक्क अशाप्रकारे उपक्रम राबविण्याचे नियोजन केले जात आहे. हा पदविका अभ्यासक्रम हे याच उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने उचललेले एक यशस्वी पाऊल आहे, अशी भावना आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रविंद्र कुलकर्णी यांनी हा पदविका अभ्यासक्रम ही एक सुरूवात असून यापुढील काळात सामाजिक न्याय, पालीभाषा व अशा प्रकारचे इतरही अभ्यासक्रम याठिकाणी सुरू करण्यात येतील, असे सांगितले. लवकरच स्मारकामध्ये मुंबई विद्यापीठाच्या सहयोगाने संशोधन केंद्र सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाचे निबंधक डॉ. प्रकाश कारंडे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेसोबत झालेला हा सामंजस्य करार विद्यापीठाच्या कामकाजातील सर्वात कमी वेळेत झालेला करार असल्याचे प्राधान्याने नोंदविले.
मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली सेक्टर-15 येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर थॉट्स’ या विषयावर पदव्युत्तर पदवीनंतरचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम 1 जुलै 2025 पासून सुरू होत असून यामुळे स्मारकाच्या नावलौकिकात अधिकच भर पडलेली आहे.