समुद्रात मच्छीमारांची बोट बुडाली

उरण : शासनाच्या बंदी कालावधीत खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली उरण करंजा येथील बोट अलिबाग येथे २६ जुलै रोजी बुडाली. या बोटीमधील ८ पैकी ५ खलाशी बचावले आहेत, तर ३ खलाशी बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ५ खलाशांवर अलिबाग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शासनाने १ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, मत्स्य विभाग अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादाने सर्रास बंदी कालावधीत मासेमारी सुरु असते. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रात बुडण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. मागील वर्षी आवरे गावातील एक खलाशी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. त्यात पुन्हा एकदा २६ जुलै रोजी शासनाने समुद्रात लाल बावटा लावून धोक्याचा इशारा दिला असतानाही उरण करंजा येथील मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट अलिबाग येथील समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत बोटीवरील ५ खलाशी पोहत पोहत अलिबाग तालुक्यातील सासवणे समुद्रकिनाऱ्यावर आले. तर उर्वरित तीन खलाशांचा शोध कोस्टगार्ड आणि नेव्हीकडून सुरु असल्याची माहिती उरण येथील परवाना अधिकारी सुरेश बाबुलगावे तसेच उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिली आहे.

या अपघातात बचावलेल्या ५ खलाशांवर अलिबाग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकंदरी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करता मत्स्य विभागाच्या कृपाशिर्वादाने सर्रास बंदी कालावधीत मासेमारी सुरु असेल तर प्रथमतः मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच उरण तालुक्यातील वशेणी, केळवणे, दादर या खाडीकिनारी राजरोसपणे बंदी कालावधीत रात्री-अपरात्री सातत्याने मासेमारी होत असल्याचे वशेणी गावच्या सरपंच सौ. अनामिका हितेंद्र म्हात्रे यांनी उरणच्या तहसीलदारांना लेखी स्वरुपात पत्र लिहून सांगितले आहे. जर त्या पत्राची दखल संबंधित प्रशासनाने घेतली असती तर सदरची दुर्घटना टळली असती, असे सरपंच सौ. अनामिका म्हात्रे यांनी नमूद केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडीत