१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम
नवी मुंबई : राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कोकण विभागातील एकूण ९ कार्यालयांची निवड गौरवासाठी करण्यात आली, या कार्यक्रमात राज्यभरातील विविध विभागांतील कार्यालयांनी दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी ओळखून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांच्या यादीत कोकण विभागीय आयुक्त कार्यालय यांना प्रथम क्रमांक मिळाला. त्यानिमित्त कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
महापालिकांचा गौरव...
महापालिका कार्यालयांच्या गटात उल्हासनगर महान्पालिका यांनी बाजी मारली. आयुक्त मनीषा आव्हाळे यांना प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय नवी मुंबई महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला असून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना चौथ्या क्रमांकासाठी गौरविण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गटात ठाणेचा झेंडा...
मुख्य कार्यकारी अधिकारी गटात ‘ठाणे जिल्हा परिषद'ने आघाडी घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन घुगे यांना प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयाने प्रशासनात सुधारणा करत उल्लेखनीय प्रगती साधली.
पोलीस विभागातील गौरव...
पोलीस आयुक्तालय गटात मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाला प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला. पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांचा यासाठी सन्मान करण्यात आला. तसेच परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक गटात संजय दराडे, कोकण परिक्षेत्र यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पोलीस अधीक्षक गटात ‘पालघर'चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमाद्वारे राज्य शासनाने प्रशासनातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन दिले असून, यामुळे कार्यपध्दतीत गती, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत यापुढील काळात आणखी व्यापक सुधारणा राबविण्याचे संकेत दिले.