ईद निमित्त मुंब्रा येथे मानवी साखळी
ठाणेः इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मुहम्मद यांनी मानवता, बंधुता आणि शांतीचा संदेश दिला. मानवी जीवनात सदर संदेश स्वीकारण्याच्या उद्देशाने, ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष'च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकाराने ‘मानवी साखळी'चे आयोजन करण्यात आले होते. मुसळधार पावसात या ‘मानवी साखळी'साठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले.
वृध्दांचा आदर करणे म्हणजे अल्लाहचा आदर करण्यासारखे आहे, तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो त्याने शिकलेल्या गोष्टी लोकांना पसरवतो. स्त्रिया अल्लाहला पुरुषांपेक्षा जास्त प्रिय असतात आणि अल्लाह त्या पुरुषाला बक्षीस देईल जो त्याच्या महरम महिलांना आनंदी करतो. खोटे बोलल्याने तुमच्या उपजीविकेवर नकारात्मक परिणाम होईल, आदि संदेशांचे फलक हातात धरुन दारुल फलाह मशिद समोरील ‘मानवी साखळी'मध्ये शेकडो वृध्द, महिला आणि तरुण सहभागी झाले होते.
यावेळी मर्जिया पठाण म्हणाल्या की, पैगंबरांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करणे एकमेव सत्कर्म आहे. सध्याची अराजकता कमी करण्यासाठी आपल्याला पैगंबरांच्या शिकवणी आत्मसात कराव्या लागतील. म्हणूनच सदर मानवी साखळी तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.