डोंबिवलीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या एरोसोल कंपनीला आग
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या एरोसिल कंपनीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आगीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे बोलले जात आहे. अग्निशमनच्या चार गाड्यांच्या मदतीने जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणली.
एमआयडीसीत फेज-1 मधील ही एअरोसिल कंपनी आहे. या कंपनीत कापडावर प्रक्रिया करण्याचे काम होत होते. बुधवारी दुपारच्या वेळेत अचानक कंपनीत आग लागली. कपडा असलेल्या ठिकाणी आग पसरताच आग मोठ्या प्रमाणावर लागली. परंतु आग लागल्याचे कंंपनीतील कर्मचारी, कामगार यांना समजताच सर्वजण तात्काळ बाहेर पडले.
अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी यांच्या देखरेखीखाली त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांनी लवकरच आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच आग जवळच्या कंपन्यांच्या भागात पसरणार नाही याची काळजी घेतली. आग कशामुळे लागली हे अद्याप निश्चित समजू शकले नाही. परंतु, शॉर्टसर्किट किंवा कपड्यावर प्रक्रिया करताना काही तांत्रिक कारणामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएश (कामा ) चे माजी अध्यक्ष डॉ. देवेन सोनी आणि इतर पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याबाबत सहकार्य केले.यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश मोरे व भाजपा पदाधिकारी मनीषा राणे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.