सिडकोनिर्मित कॉलनीमधील गरजेपोटीच्या बांधकामाबाबत निर्णयासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक - ना. गणेश नाईक
सलग 12 तास अखंड चालला विक्रमी जनता दरबार
नवी मुंबई : वनेमंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री नामदार गणेश नाईक यांचा तिसरा जनता दरबार 4 एप्रिल रोजी नवी मुंबई येथे पार पडला. या जनता दरबारामध्ये तब्बल 610 निवेदने नागरिकांनी सादर केली. यातील बहुसंख्य निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. उर्वरित निवेदनांवर समयबद्ध कार्यवाही करण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता सुरू झालेला वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये पार पडलेला हा जनता दरबार रात्री 11 वाजेपर्यंत अखंड सुरू होता. जनता दरबारामध्ये उपस्थित शेवटच्या निवेदनकर्त्यालाही नामदार नाईक भेटले. या जनता दरबाराला माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह महसूल, महापालिका, सिडको, पोलीस, एमआयडीसी, शिक्षण, आरोग्य, वने इत्यादी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मागच्या जनता दरबारामध्ये सादर झालेल्या निवेदनांवर काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती देखील नागरिकांना जनता दरबारामध्ये देण्यात आली.
सिडकोनिर्मित एलआयजी आणि ईडब्लूएस कॉलनीमध्ये रहिवाशांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना महापालिकेने नोटीसा बजावलेल्या आहेत. या संदर्भात माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रदीप गवस, माजी नगरसेविका स्नेहा पालकर, तुकाराम कदम या मंडळींनी रहिवाशांसह नाईक यांना निवेदन सादर केले. 1980 पासून सिडको महामंडळाने माथाडी वर्गासह अन्य सर्वसामान्य श्रमिक घटकांसाठी इमारती बांधल्या. कालांतराने या इमारतींमधून राहणाऱ्या रहिवाशांची कुटुंब वाढल्याने त्यांनी घरावर घर आणि गरजेपोटीची बांधकामे केली. मात्र महापालिकेने या बांधकामांना नोटीसा बजावलेल्या आहेत. ही कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर नरेंद्र पाटील यांनी या घटकांसाठी एखादी चांगली योजना शासनाने आणावी अशी मागणी केली.
या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल, असे नामदार नाईक यांनी निवेदनकर्त्यांना आश्वासित केले. तोपर्यंत गरजेपोटीच्या राहत्या घरांवर कारवाई न करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या.
श्रमिक सेनेच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई परिवहन सेवेतील ठोक मानधन संवर्गातील कर्मचाऱ्यांनी नामदार नाईक यांना निवेदन दिले. नव्याने होत असलेल्या कर्मचारी भरतीमध्ये सामावून घेण्याची मागणी केली. या विषयावर या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उचित कार्यवाही करण्याच्या सूचना नाईक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी एडवोकेट अंशुवर्धन आणि नागरिकांनी निवेदन दिले. यावर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल यांच्याबरोबर दूरध्वनीवर नाईक यांनी चर्चा केली. तोपर्यंत लॉटरी विजेत्यांकडून घेण्यात येणाऱ्या कन्फर्मेशन शुल्काला मुदतवाढ देण्याचे नामदार नाईक यांनी सुचित केले असता दोन आठवड्याची मुदतवाढ देण्यात येईल असे गोयल यांनी कबूल केले.
नवी मुंबईमध्ये शुक्रवारी पार पडलेला तिसरा जनता दरबार होता. पालघर जिल्ह्यातही यापूर्वी 2 जनता दरबार पार पडले आहेत. येत्या 11 एप्रिल 2025 रोजी ठाण्यामध्ये दुसऱ्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. जनता दरबारामधून नागरिक आपल्या समस्यांचा निपटारा करून घेत आहेत.