रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सखोल स्वच्छता
नवी मुंबई : सध्या पाऊस ओसरत असताना वातावरणातील उष्णता कमालीची वाढली असून पावसाळी कालावधीतील रस्त्यांकडेचा चिखल वाळल्याने धुळीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या गोष्टाकडे गांभीर्याने लक्ष देत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्राधान्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर सखोल स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'मार्फत वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते आणि नागरिकांची वर्दळ असते असे शहरातील ठाणे बेलापूर मार्ग, आम्र मार्ग, पामबीच मार्ग तसेच अंतर्गत मुख्य रस्ते या रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला साचलेली माती साफ करुन उचलून घेण्याची सखोल स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. या साफसफाईत ब्रशने रस्त्याचा पृष्ठभाग साफ केला जात आहे. तसेच पिलपर मशीनचाही वापर केला जात आहे. यासोबतच यांत्रिकी मशीनचाही उपयोग रस्ते सफाईसाठी प्रभावीपणे केला जात आहे.
‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'मार्फत नियमित केली जाणारी साफसफाई दिवसातून दोन वेळा दोन सत्रात अधिक काळजीपूर्वक केली जात असून त्यामध्ये रस्त्यांवरील मातीही साफ करण्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त डॉ.अजय गडदे यांच्यासह त्यांचा स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांचा समुह या कामाकडे प्रत्यक्ष पाहणी करुन बारकाईने लक्ष देत असून अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यामार्फतही या सखोल स्वच्छता कामाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
नवी मुंबई शहराची नियमित स्वच्छता करताना धुळीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी व्हावे या भूमिकेतून दिघा पासून बेलापूर पर्यंत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अगदी दिवाळीच्या सणातही सुरु असलेल्या या सखोल स्वच्छता मोहिमेबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.