कल्याण, डोंबिवलीत पावसाचे धुमशान

कल्याण : गेल्या दोन ते तीन दिवसापासून संतत धार पडणाऱ्या पावसाचा १८ ऑगस्ट रोजी जोर वाढला. पहाटेपासून कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना नाहकांचा त्रास झाला.                  

कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचल्याने, तर कल्याण  लोहमार्ग पोलीस स्टेशन मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने पाण्यात पोलिसांना आपले कामकाज करण्याची वेळ आली. मानपाडा पोलीस स्टेशन, बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता, डायघर परिसरात देखील पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालक तसेच नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. कोपर परिसरात पाणी साचल्याने सखल भागातील घरात पाणी शिरले.

ऐन गणपती सण तोंडावर आला असताना खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांचा पावसामुळे हिरमोड झाला. तर फेरीवाले, ठेलेवाले यांची पावसामुळे आपल्या विक्री मालाचे नुकसान होऊ नये म्हणून पळापळ झाली. काळू नदी, उल्हास नदी या पावसामुळे दुथडी भरुन वाहत आहेत.

तर नेतवली टेकडी परिसरातील भवानी नगरात टेकडीवरील दगड माती कोसळल्याने २ घरांचे नुकसान झाले. १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास सदर दुर्घटना घडली. घरातील सदस्य घराबाहेर असल्याने सुर्दैवाने जीवितहानी टळली. घटनास्थळी केडीएमसी आप्तकालीन व्यवस्था टीम, अग्निशमन दलाचे जवान यांनी मदत कार्य सुरु केले.    

कल्याण पश्चिमेतील भगवा तलाव २ दिवसाच्या पावसामुळे काठोकाठ तुडुंब भरला आहे. कल्याण पश्चिमेतील पारनाका लाल चौकी रस्त्यावर धोकादायक इमारतीचा स्लँब कोसळल्याची घटना सकाळी घडली. धोकादायक इमारत असल्याने रिकामी होती. त्यामुळे जीवितहानी टळली. डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने लोकांना पाण्यातून ये-जा करण्याची वेळ आली. तर कल्याण ग्रामीण परिसरातील म्हारळ, कांबा, टिटवाळा, मोहने, बल्याणी, उंभर्णी, रूंदे, आदि गाव परिसरात पावसाचा जोर असल्याने शेती कामाचा वेग मंदावला होता.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महावितरण'ची वीज चोरांविरुध्द धडक कारवाई