जमिनी विकू नका, व्यवसायात पार्टनर व्हा
पनवेल : रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहे, कोण येत आहे, काय माहित नाही. ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीसह कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अनेकांनी जमिनी घेतल्या. सदर जमिनी आपलीच मंडळी विकत आहेत. पण, त्यांना कळतच नाहीये की यातून आम्हीच संपणार आहोत, असा इशारा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. स्थानिकांना आणि राज्यातील प्रत्येक भूमीपुत्राला आवाहन करत यापुढे उद्योगधंद्यांसाठी आणि जमिनीसाठी तुमच्याकडे लोक आले तर, जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत. आम्ही कंपनीत कामालाही लागू आणि शेतकरी असल्याने कंपनीत पार्टनर म्हणून येऊ, फुकटच्या जमिनी देणार नाही, असे ठणकावून सांगण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
दरम्यान, परिस्थिती वेळीच सावरली नाही तर उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन २ ऑगस्ट रोजी पनवेल मध्ये संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे खासदार संजय राऊत, शेकाप चिटणीस आ. जयंत पाटील, मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. महाराष्ट्रात मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मराठी आणि भाषावादाचा मुद्दा अधोरेखित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करत आहेत. पण, राज्यात जे कामधंद्यांसाठी बाहेरुन येतात, त्यांना मराठी कशी येईल याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनात नाही. महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रातला भूमीपूत्र याचा काही विचार नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेवर निशाणा साधला.
दुसरीकडे देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो मी हिंदी नाही, गुजराती आहे. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले. ात्येक माणसाला राज्याबद्दल प्रेम असते, मग आम्ही बोललो की, संकुचित कसे ठरतो. निवडणुका वगेरे येत राहतील. मात्र, एकदा तुमची भाषा आणि जमीन गेली की, जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलेही स्थान नाही. प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करीत आहे. आम्ही बोललो की संकुचित कसे होतो?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'एकदा तुमची भाषा संपली आणि एकदा तुमची जमीन गेली तर जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही स्थान नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष आहे. ३ ऑगस्ट १९४७ रोजी ‘शेकाप'ची स्थापना झाली आणि १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. महाराष्ट्रामधील स्वातंत्र्यपूर्व काळातला शेकापक्ष इतक्या वर्षानंतरही सर्व टिकवून ठेवले आहे, याबाबत आश्चर्य वाटत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
आज ‘शेकाप'साठी आलो आहे. एकीकडे शेतकरी बर्बाद होतोय, तर दुसरीकडे राज्यात बाहेरुन कामगार येतच आहेत. अशावेळी ‘शेकाप'चा उपयोग काय? तेव्हा जयंतराव तुम्ही रायगड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेतली पाहिजे. त्यामुळे शेतकरी बर्बाद होण्यापासून वाचेल. रायगडमधील मराठी तरुण-तरुणी येथील उद्योगधंद्यांमध्ये कामाला लागले पाहिजे यावर लक्ष द्या. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात १०० टक्के स्थानिक भूमीपुत्र, मराठी उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, असा आग्रही सूर राज ठाकरे यांनी यावेळी आळवला.
अर्बन नक्षल ठरवून अटक कराच; सरकारला आव्हान
अर्बन नक्षल ठरवून अटक कराच..., असे थेट आव्हान देत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. महाराष्ट्रात मराठीचा आणि भूमीपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
बाहेरुन कोणीतरी उद्योगपती येणार आणि ते वाटेल तसे राज्यात थैमान घालणार. राज्य सरकारने म्हणे जमिनीवर कायदा आणला असून त्यात अर्बन नक्षल असा उल्लेख आहे. म्हणजे कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार अटक करु शकते. ठिक आहे एकदा करुच देत असे बोलत राज ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिले. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभा राहणार नाही असे ठणकावतानाच जर उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान राखून आणावे लागतील; त्याशिवाय उद्योग आणता येणार नाही, याच भूमिकेवर ठाम राहत महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंती राज ठाकरे यांनी रायगडवासीय आणि तमाम मराठी भाषिकांना यावेळी केली.