चाळींमध्ये शिरले पुन्हा गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी
कल्याण ; नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे टिटवाळा पश्चिम आझाद नगर भागात पुन्हा एकदा गटाराचे दुर्गंधीयुत पाणी शिरुन कहर सुरु झाला आहे. ड्रेनेज यंत्रणेचा अभाव, अनधिकृत चाळींची वाढती संख्या आणि प्रशासनाचा सावळा गोंधळ कारभार यामुळे चाळीतील नागरिकांच्या घरात थेट गटाराचे सांडपाणी मिश्रित पाणी शिरत असून दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे संभाव्य नागरी आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
ड्रेनेज लाईनचाच अभाव असलेल्या या भागात दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या उद्भवत असून, यंदा देखील गटाराचे सांडपाणी थेट घरात घुसल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.
याबाबत मलनिःस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सांगितले की, काही ठिकाणी ड्रेनेज लाईनवर लोकांनी चाळी बांधलेल्या आहेत. त्यामुळे सफाईसाठी अडचणी येत आहेत. येथील अनधिकृत बांधकाम चाळी हटवण्याबाबत सहाय्यक आयुक्तांना रिपोर्ट केलेला आहे. तसेच सध्या तुंबलेल्या ड्रेनेज लाईनच्या सफाईचे काम असणारा जुना ठेका रद्द करण्यात आला असून नव्याने कामाचा ठेका देण्यासाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत. याबाबतच्या काही टेक्निकल बाबींवर अभ्यास चालू असून येत्या आठवड्याभरात ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी अधिक कार्यक्षमता असलेल्या गाड्या सेवेत रुजू होतील, असे नवांगुळ यांनी सांगितले.
टिटवाळा येथे सावरकर नगर, नांदप रोड, सिध्दीविनायक कॉलनी, एक नव्याने गाडी काम कारण्यासाठी पाठवल्याचे त्यांनी सांगितले. तर सध्या उपलब्ध असलेली यंत्रणा अपुरी असून ती अधिक चांगल्या पध्दतीने कार्यक्षम करण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही नवांगुळ म्हणाले.
आझाद नगरसह टिटवाळा मधील अनेक भागात गटार सफाई, मलनिःस्सारण यंत्रणा आणि पावसाळी पूर्वतयारी संबंधीची दिरंगाई नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. प्रशासकीय सावळा गोंधळ कारभाराचे सर्वोत्तम उदाहरण असल्याची टिका यानिमित्ताने सर्वसामान्य करदात्या नागरिकांकडून केली जात आहे.