पारसिक डोंगर भागातील ‘मेटल बीम क्रॅश बॅरिअर' मोडकळीस
महापालिका शहर अभियंत्यांना निवेदन
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका बेलापूर विभाग कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पारसिक डोंगर परिसरातील रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या ‘मेटल बीम क्रॅश बॅरिअर'ची दुरुस्ती करण्याची तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा रस्त्याच्या शेजारुन होण्यासाठी रस्त्यालगत चर खोदण्याची मागणी आग्रोळी मधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर गोरखनाथ पाटील यांनी महापालिका शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका बेलापूर विभाग कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पारसिक डोंगर परिसरातील रस्त्यालगत लावण्यात आलेल्या ‘मेटल बीम क्रॅश बॅरिअर'ची metal beam crash Barrier दुरवस्था झाली असून, सदर ‘मेटल बीम क्रॅश बॅरिअर' लावतानाच ते नित्कृष्ठ दर्जाचे तसेच हलक्या गुणवत्तेचे लावण्यात आले असल्याने आज त्यांची परिस्थिती अपघात वाचविण्यापेक्षा अपघात घडविण्याची झाली आहे. ‘मेटल बीम क्रॅश बॅरिअर' अपघातांची तिव्रता कमी करते, वाहनांना रस्त्यावरुन बाहेर जाण्यापासून रोखते, इत्यादी रस्ता सुरक्षा उपाय करण्याचे काम करत असताना येथील ‘मेटल बीम क्रॅश बॅरिअर' मोडकळीस आले असून, त्यांना लावण्यात आलेले स्क्रू निखळून पडलेल्या अवस्थेत असल्यामुळे स्वतःच धोक्यात आहेत, असे सुधीर पाटील यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.
पावसाळ्यामध्ये डोंगरभागातून येणारे पावसाचे पाणी चरांची मिर्मिती न केल्यामुळे रस्त्यातून वाहत असते. त्यामुळे सततच्या पावसाच्या पाण्यामुळे डांबरीकरण केलेल्या रस्त्यात खड्डे पडून वाहन अपघाताची शक्यता वाढते, असे निवेदनात निदर्शनास आणून, ‘नवी मुंबई महापालिकेने यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाच्या पाण्याचा निचरा रस्त्याच्या कडेने होण्यासाठी रस्त्यालगत चरांची निर्मिती करावी', अशी मागणी सुधीर पाटील यांनी निवेदनात केली आहे.
भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी पारसिक डोंगर परिसरातील रस्ता शेजारील दुरवस्था झालेल्या ‘मेटल बीम क्रॅश बॅरिअर'ची दुरुस्ती करण्याचे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा रस्त्याच्या शेजारुन होण्यासाठी रस्त्यालगत चर खोदण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर होईल, अशी अपेक्षा आहे. - सुधीर गोरखनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते - आग्रोळी, नवी मुंबई.