मध्यवर्ती शासकीय रुग्णालय मधील अनागोंदी कारभार तात्काळ थांबवा

उल्हासनगर : उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात औषधे उपलब नसणे, डॉक्टरांची कमतरता, रुग्ण वॉर्डमध्ये अस्वच्छता, रक्त तपासणीचे रिपोर्ट वेळेवर न मिळणे, अशा अनेक तक्रारी असून येत्या आठवडाभरात या समस्यांवर तोडगा काढला न गेल्यास मध्यवर्ती शासकीय रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्क्रिय कार्यपध्दती विरोधात आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ‘मनसे'चे मैनुद्दीन शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिला आहे.

शहरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालय जिल्हास्तरीय शासकीय रुग्णालय असल्याने उल्हासनगर, अंबरनाथ शहरातील रुग्णांसोबत मुरबाड, शहापूर, कर्जत तालुक्यातील रुग्ण सुध्दा सदर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात. शासनाने या रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. परंतु, रुग्णालय व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्हास्तरावरील आणि चार, पाच तालुक्यांमधील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सुरु असलेल्या अनागोंदी कारभारामुळे येथील रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सुध्दा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

रक्त तपासणीचे रिपोर्ट उशिराने म्हणजे तब्बल ७ ते १० दिवसांनी मिळत असल्याने रुग्णांना होणारा त्रास, ओपीडी विभाग सकाळी ८ वाजता सुरु करावा. तसेच संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत डॉक्टरांची ओपीडी मध्ये उपस्थिती असावी. जळालेल्या, भाजलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध असताना तो बंद अवस्थेत असणे, रुग्णालयात अनेक ठिकाणी भंगार अवस्थेत साहित्य पडलेले असणे, अनेक वॉर्ड सुस्थितीत असताना सुध्दा बंद अवस्थेत असणे, रुग्णालयाच्या आवारात मलवाहिन्या फुटलेल्या असल्याने सतत दुर्गंधीचा अतिशय उग्र असा वास येत असतो. धूळ, माती, कचरा, झाडांचा पाला-पाचोळा मोठ्या प्रमाणात पसरलेला असल्याने रुग्णालयाचा परिसर बाहेरुनच घाणेरडा आणि अस्वच्छ असणे, रुग्णालयातील रुग्णांना अनेक वेळा अनेक तास अंधारात उपचार घेण्याची वेळ येणे या आणि मध्यवर्ती रुग्णालयात सामान्य रुग्णांना भेडसावणाऱ्या सर्वच समस्यांच्या तक्रारींचे निवेदन ‘मनसे'च्या वतीने आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे विभागाचे उप-संचालक नांदापुरकर आणि मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांना देखील देण्यात आले.

येत्या आठवडाभरात सदर समस्यांवर तोडगा काढला न गेल्यास मध्यवर्ती शासकीय रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्क्रिय कार्यपध्दती विरोधात आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नसल्याचा इशारा ‘मनसे'चे मैनुद्दीन शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिला आहे. यावेळी महानगर संघटक मैनुद्दीन शेख, विधी विभागाचे जिल्हा अध्यक्ष ॲड. कल्पेश माने, उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव, विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे, कैलास वाघ, प्रकाश कारंडे, शाखा अध्यक्ष दीपेश धारिवाल, नरेश चिकसे, जगदीश माने, साहिल सय्यद तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नरेंद्र पाटील यांना विधान परिषदवर संधी द्या