तुर्भे नाका पादचारी पुलावर फेरीवाल्यांचे बस्तान

तुर्भे : तुर्भे नाका पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना या पादचारी पुलावरुन चालताना नाहक त्रास होत आहे.

तुर्भे एमआयडीसी आणि तुर्भे नागरी वस्ती यांना जोडण्यासाठी तुर्भे नाका येथे पादुचारी पुल उभारण्यात आला आहे. या पुलाची उभारणी झाल्यानंतर काही दिवसातच फेरीवाल्यांनी या पादुचारी पुलाचा ताबा घेतला, तेव्हापासून अद्यापपर्यंत फेरीवाल्यांनी या पादुचारी पुलावर बिनदिवकतपणे नवी मुंबई महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन अनधिकृत व्यवसाय चालू केले आहेत. त्यामुळे तुर्भे एमआयडीसी, झोपडपट्टी परिसरातील शाळकरी मुले-मुली आणि रोजगार करिता ये-जा करणारे रहिवाशी यांना पादुचारी पुलावर फेरीवाल्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करत आपला मार्ग गाठावा लागत आहे.

तुर्भे नाका येथील पादचारी पुलावर ५० पेक्षा अधिक फेरीवाले बसलेले असतात. त्यांच्याकडून महापालिका तुर्भे विभाग कार्यालयातील एक नोटीस बजावणारा हप्ता घेऊन जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच तुर्भे नाका येथील पादचारी पुलावर राजरोसपणे व्यवसाय करणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही, असे या पादचारी पुलावरुन नेहमी ये-जा करणारे नागरिक सांगत आहेत.

तुर्भे झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना तुर्भे गावामध्ये माता बाल रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे तुर्भे नाका येथील पादचारी पुलावरुन पुष्कळ प्रमाणात महिलांची ये-जा असते. या गर्दीचा गैरफायदा घेत तुर्भे नाका येथील पादचारी पुलावर भुरट्या चोरांचे प्रमाणही वाढले आहे. याशिवाय तुर्भे नाका येथील पादचारी पुलावर फेरीवाल्यांच्या आडून काही गर्दुल्ले देखील बसलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न देखील निर्माण झाला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त.. १७ सप्टेंबरचा ?