डोहाळ जेवणातही घेतली ‘कविता डॉट कॉम'च्या कवितांची रंगत
नवी मुंबई : कोपरखैरणेमधील गणोबा मंदिरात सौ. पूजा मुळीक यांच्या डोहाळ जेवण आणि ओटीभरण निमित्त ‘संवाद नात्यांचा, कविता डॉट कॉम' हा कार्यक्रम शेकडो महिलांच्या उपस्थितीत ११ मे रोजी संध्याकाळी संपन्न झाला. सौ.पूजा सूरज मुळीक यांचे ‘कवितांचे डोहाळे' पुरवण्याचे काम मुळीक परिवाराने करून समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. ‘जीवन विद्या मिशन'च्या संस्कारात वाढलेले अनेक साधक या वेळी हजर होते आणि कविता माध्यमातून, सद्गुुरूंच्या आशीर्वादाने आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे होऊ शकतो हा विचार घेत या सोहळ्यात सहभागी झाले.
कवी प्रसाद माळी, रूद्राक्ष पातारे, सौ.रुपाली लटके, सौ.स्वाती शिवशरण, सौ.अक्षता गोसावी यांनी दोन फेऱ्यात एकापेक्षा एक कविता सादर करत टाळ्या घेतल्या. सर्व राष्ट्रात ‘मातृदिन' दिवस साजरा होत असल्याने आई या विषयावरील कवितांनी रसिकांना वेगळ्याच विश्वात नेले. सूत्रसंचालक-कवी शंकर गोपाळे यांनी विविध उदाहरणे, प्रसंग, किस्से सांगून कार्यक्रमाची रंगत वाढवली. गोपाळे यांनी आपली बाप नावाची कविता सादर केल्यानंतर, आयोजक सूरज मुळीक यांनी आपले आई वडील सौ/श्री.रेखा भगवान मुळीक यांना चक्क व्यासपीठावर मिठी मारून नमस्कार करत बाप-लेकाचे नाते एक अनोखे पाते असते हे पटवून दिले. ‘कविता डॉट कॉमचे' निर्मिती सुत्रधार प्रा.रवींद्र पाटील यांनी कविता, फुल आणि रांगोळी माणसाच्या जीवनात जन्म ते मृत्यू असे शेवटपर्यंत सुखादुःखात नांदत असल्याचे सांगत, खरी कविता गेल्या सातशे वर्षांपूर्वी पासून महिलांनी जात्याभोवती फिरवत, रंगवत, सजवत ठेवली आहे, हे नमूद केले. या कार्यक्रमात भजन, पारंपरिक पाळणेदेखील भारतीय संस्कृतीला शोभून साजरे झाले. सूरज मुळीक यांनी आपल्या माता पिता यांच्यासह ‘कविता डॉट कॉम'च्या सर्व कवींचे स्वागत केले व आभार मानले.