रायगड जिल्हा आरोग्य विभाग आणि स्वदेस फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आरोग्यसेवांच्या उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा म्हणून स्वदेस फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रियदर्शनी मोरे तसेच ‘स्वदेस फाऊंडेशन'चे संचालक प्रदीप साठे, तुषार इनामदार, वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार, मेघना फडके, सहाय्यक व्यवस्थापक जुलेखा शेख उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने डॉ. नितीन बावडेकर, ‘स्वदेस फाऊंडेशन'च्या वतीने रमुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे आणि उपसंचालक आरोग्य-स्वदेस फाउंडेशन डॉ. सुरेंद्र यादव यांनी सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी केली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या सुचनेनुसार सदर सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या करारनाम्याचा मुख्य उद्देश शासनाच्या आरोग्यसेवा मजबूत करणे आणि ग्रामीण समुदायांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यात मदत करणे, असा आहे. या सहकार्याद्वारे स्वदेस फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्फत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी मदत करणार आहे. याद्वारे भागीदारी समुदायावर आधारित शासकीय आरोग्य कार्यक्रमांबाबत जनजागृती वाढवेल आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचविण्याची खात्री करेल.
रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांची स्वदेस फाऊंडेशन रायगड जिल्ह्यामधील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि सुधागड या तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणासाठी समग्र ३६०-अंश दृष्टिकोनातून कार्य करणारी स्वयंसेवी संस्था या तालुक्यामध्ये सामंजस्य करारामुळे फायदा होणार आहे.