अंजुरफाटा-चिंचोटी रस्त्याची दुरवस्था
भिवंडी : मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन या महामार्गावरुन प्रवास करावा लागत आहे. मात्र, रस्त्याच्या या दुरवस्थेकडे शासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
या रस्त्यावर कालवार गावाजवळ भला मोठा खड्डा पडल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरुप आले असून, या खड्ड्यात मोठा टेम्पो आदळल्याने तो नादुरुस्त होऊन बंद पडला. सदरचा खड्डा इतका मोठा होता की टेम्पोचे पुढचे चाक खड्ड्यात तर मागचे चाक वर उचलले गेले होते. या मार्गावर टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेत येथील टोल वसुली बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे बांधकाम विभागासह कोणत्याही यंत्रणेचे लक्ष नाही.
सध्या या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे भरणार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे या पावसाळ्यात येथील ग्रामस्थांसह वाहन चालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार, अशी परिस्थिती आहे.