अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी दोषी : न्यायालयाचे शिक्कामोर्तब
बिद्रे हत्याकांडाचा प्रकार हा दुर्मिळातला दुर्मिळ : न्यायालयाचे मत
पनवेल : राज्यातच नव्हे तर देशभरात गाजलेल्या अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर व या हत्या प्रकरणात कुरुंदकरला मदत करणारे आरोपी कुंदन भंडारी व महेश फळणीकर या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी शनिवारी दोषी ठरवले. अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा प्रकार हा दुर्मिळातला दुर्मिळ असल्याचे मत नोंदवत न्या. पालदेवार यांनी या गुह्यात दोषी ठरलेल्या तीन्ही आरोपींना 11 एप्रिल रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे जाहिर केले. तर या हत्याप्रकरणातील दोन नंबरचा आरोपी राजु पाटील याची मात्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची निर्घृणपणे हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते भाईंदरच्या खाडीत टाकुन पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी स्वत: एक पोलीस अधिकारी असल्यामुळे त्याने आपल्या कौशल्याचा वापर करुन सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मात्र जे परिस्थितीजन्य पुरावे आढळुन आले आहेत, त्याच्या आधारे अभय कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे तसेच त्याने बनावट रेकॉर्ड तयार करुन वरिष्ठांची दिशाभुल केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अभय कुरुंदकर याच्या विरुद्ध हत्या, बनावट रेकॉर्ड तयार करणे तसेच वरिष्ठांची दिशाभुल केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याचे न्या. पालदेवार यांनी स्पष्ट केले.
तर अश्विनीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकर याचा चालक कुंदन भंडारी याने गोणी आणुन त्यात मृतदेहाचे तुकडे भरले. तर कुरुंदकर याचा मित्र महेश फळणीकर याने गोणीत भरलेला अश्विनीचा मृतदेह भाईंदरच्या खाडीत टाकण्यास मदत केली. तसेच भाईंदर येथील ज्या घरामध्ये कुरुंदकर याने अश्विनीचे तुकडे केले, त्या घरातील भिंतीवरील रक्ताचे डाग मिटवण्यासाठी कुंदन भंडारी याने पेंटर आणुन ते रंगवुन घेतले. तसेच अश्विनीच्या शरीराचे तुकडे असलेली गोणी नेण्यासाठी जी गाडी वापरली होती, त्या गाडीची देखील रंगरगोटी करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालयाने कुंदन भंडारी व महेश फळणीकर या दोघांना गुह्यातला पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याने त्यांना दोषी ठरवले आहे.
दरम्यान, अश्विनीच्या हत्येच्या कटात राजु पाटील याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे न्यायालयाला आढळुन आले नाहीत. त्यामुळे न्या. पालदेवार यांनी राजु पाटील याची सबळ पुराव्या अभावी मुक्तता केली.